Stock Markets Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्णयापूर्वी सेन्सेक्स १२० अंकांनी, तर निफ्टी सुमारे ५० अंकांनी घसरला होता. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच येथे मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. खाजगी बँका आणि रिअल्टी क्षेत्रातील तेजी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते.
सकाळी ९:२२ च्या सुमारास सेन्सेक्स १३५ अंकांच्या घसरणीसह ८३,१७८ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ४६ अंकांनी घसरून २५,५८२ वर पोहोचला होता. बँक निफ्टी मात्र ४० अंकांच्या वाढीसह ६०,१०४ वर होता. आयटी आणि फार्मा क्षेत्रात १ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. याशिवाय हेल्थकेयर, मेटल, मीडिया, ऑटो आणि मिड्समॉल हेल्थकेअर इंडेक्समध्येही घसरण दिसून आली, तर पीएसयू बँका, खाजगी बँका आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रात तेजी होती.
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
निफ्टीवर बजाज फायनान्स, भारती एअरटेल, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड टायटन, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक या शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, मॅक्स हेल्थकेअर, एचसीएल टेक, ओएनजीसी, एशियन पेंट्स, ट्रेंट आणि बीईएल हे शेअर्स आज घसरणीसह व्यवहार करणाऱ्यांच्या यादीत होते.
मागील बंदच्या तुलनेत पाहिलं असता, सेन्सेक्स ६४ अंकांच्या घसरणीसह ८३,२४९ वर उघडला. निफ्टी ३७ अंकांनी घसरून २५,६०५ वर, तर बँक निफ्टी ९६ अंकांच्या घसरणीसह ५९,९६७ वर उघडला. चलन बाजारात रुपया ६ पैशांनी वधारून ९०.२९ प्रति डॉलरवर उघडला. जागतिक बाजारातील मोठी घसरण, क्रिप्टो आणि कमोडिटी बाजारातील विक्री, कमकुवत गिफ्ट निफ्टी आणि आज आरबीआयनं जाहीर होणारा व्याजदराचा निर्णय या गोष्टी आज बाजाराची दिशा ठरवतील. यासोबतच कंपन्यांचे निकाल आणि विदेशी व देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या हालचालींवरही गुंतवणूकदारांचं लक्ष असेल.
