Patanjali Foods Q3 Results : डिसेंबर तिमाही निकालात अनेक दिग्गज कंपन्यांचा नफा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत स्वदेशी ब्रँड म्हणून लोकप्रिय असलेल्या बाबा रामदेव यांच्या पतंजलीने मात्र बाजी मारली आहे. रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या पतंजली फूड्स कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत पतंजलीचा निव्वळ नफा ७१.३ टक्क्यांनी वाढून ३७०.९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत ते २१६.५ कोटी रुपये होता. यामध्ये तेलाचा सिंहाचा वाटा आहे.
पतंजली फूड्सच्या नफ्यात ७१ टक्के वाढ
कंपनीने सोमवारी शेअर बाजाराला आपल्या निकालाची माहिती दिली. यात ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून ९,१०३.१३ कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ७,९१०.७० कोटी रुपये होते. या तिमाहीत, कंपनीचा EBITDA ५७.१ टक्क्यांनी वाढून ५४०.५ कोटी रुपये झाला, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ३४४.१ कोटी रुपये होता. EBITDA मार्जिन गेल्या वर्षीच्या तिमाहीत ४.४ टक्क्यांनी वाढून ५.९ टक्के झाले. EBITDA म्हणजे सोप्या शब्दात कंपनीने केलेला नफा ज्यावर कर वगैरे भरणे बाकी आहे.
कंपन्याच्या नफ्यात तेलाचा सर्वाधिक वाटा
कंपनीने तिसऱ्या तिमाहीत अन्न आणि इतर FMCG विभागातून २,०३७.६१ कोटी रुपयांचा नफा कमावला. घर आणि पर्सनल केअर विभागातून कंपनीचा महसूल ४२०.३६ कोटी रुपये होता. तर स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलातून कंपनीला सर्वाधिक नफा मिळाला. तिसऱ्या तिमाहीत कंपनीला खाद्यतेलातून ६,७१७.४७ कोटी रुपयांचा नफा झाला, जो गेल्या वर्षी ५,४८४.६४ कोटी रुपये होता.
२९ देशांमध्ये पतंजलीचा माल निर्यात
पतंजली फूड्सने १ नोव्हेंबर २०२४ रोजी पतंजली आयुर्वेदाचा गृह आणि पर्सनल केअर व्यवसाय १,१०० कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यासोबत दंत, त्वचा, केस आणि होम केअर विभागांमध्ये देखील त्याची व्याप्ती वाढली आहे. महागाई आणि कच्च्या मालाच्या चढ्या किमतींमुळे तिसऱ्या तिमाहीत मागणीतही थोडीशी घट दिसून आली. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत निर्यातीतून ६७.२७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. पतंजली जवळपास २९ देशांमध्ये आपला माल निर्यात करते.