Atlas Cycle Share Price : २० दिवसात पैसे दुप्पट. होय. तुम्ही बरोबर वाचलंत. सायकल तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरनं अवघ्या २० दिवसांत गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट केली आहे. २०२० मध्ये या कंपनीवर ट्रेडिंगवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, गेल्या महिन्यात ही बंदी उठवण्यात आली. बंदी उठताच हा स्टॉक रॉकेट बनला. या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं अपर सर्किट लागलं आहे.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही कंपनी म्हणजे अॅटलस सायकल्स (हरयाणा) लिमिटेड (Atlas Cycles (Haryana) Ltd) ही आहे. बुधवारीही कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर पोहोचला. अपर सर्किटनंतर सकाळी ११ वाजता हा शेअर १३६.७६ रुपयांवर व्यवहार करत होता. मंगळवारी कंपनीचा शेअर १३०.२५ रुपयांवर बंद झाला.
२०२० मध्ये घातलेली बंदी
डिसेंबर २०२० मध्ये कंपनीच्या शेअर्सवर बंदी घालण्यात आली होती. अॅटलासनं आपला आर्थिक वर्ष २०२४ चा वार्षिक अहवाल सादर केला होता. या अहवालात कंपनीनं वित्तीय निकाल न दाखल केल्यामुळे किंवा उशीर झाल्यामुळे बीएसई आणि एनएसईनं १६ डिसेंबर २०२० रोजी शेअर्सच्या व्यवहारावर बंदी घातली होती.
यानंतर गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी बीएसई आणि एनएसईनं अॅटलासच्या शेअर्सच्या ट्रेडिंगवरील बंदी उठवली. म्हणजे ही बंदी उठवायला चार वर्षे लागली. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा ट्रेडिंग सुरू झालं.
२० दिवसांत पैसे दुप्पट
ही बंदी उठताच कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी आली आहे. हा शेअर २७ डिसेंबर रोजी ६२.९९ रुपयांवर उघडला आणि पहिल्याच दिवशी ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर पोहोचला. यासह कंपनीच्या शेअरची किंमत ६६.१३ रुपये झाली होती. तेव्हापासून त्यात सातत्यानं तेजी दिसून येत आहे.
हा शेअर सध्या १३६.८० रुपयांवर व्यवहार करत आहे. त्यामुळे २७ डिसेंबर २०२४ पासून २० दिवसांत त्यात ११७ टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजेच या २० दिवसांत शेअरची किंमत दुपटीहून अधिक झालीये.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)