Anil Ambani Reliance Power: मंगळवारी अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरचे शेअर्स कोसळले. मंगळवारी बीएसईवर रिलायन्स पॉवरचे शेअर्स ७% पेक्षा जास्त घसरून ४०.६८ रुपयांवर आले. अनिल अंबानी समूहाची प्रमुख कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्सही ५% नं घसरले. सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) मोठ्या कारवाईनंतर रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे.
ईडीनं मालमत्ता जप्त केली
शुक्रवारी, सक्तवसूली संचालनालयानं (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाच्या ४० मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये अनिल अंबानी यांचे मुंबईतील पाली हिल्स येथील निवासस्थान आणि दिल्लीतील रणजित सिंह मार्गावरील रिलायन्स सेंटरचा समावेश आहे. सक्तवसूली संचालनालयानं दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईमधील मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली.
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्सही घसरले
मंगळवारी अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्सही घसरले. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स ५% घसरून १९३.७० रुपयांवर आले. मंगळवारी कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या नवीन नीचांकी पातळीवर पोहोचले. गेल्या महिन्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स २०% पेक्षा जास्त घसरले आहेत. या वर्षी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स ३९% पेक्षा जास्त घसरले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स एकाच वर्षात ३४% घसरले आहेत.
कंपनीनं जारी केलं निवेदन
ईडीनं केलेल्या कारवाईबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एक निवेदन जारी केले आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडनं सोमवारी सांगितलं की, कंपनीच्या काही मालमत्ता सक्तवसूली संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. त्यांनी हेही स्पष्ट केलं की या निर्णयाचा त्यांच्या व्यवसायिक कामकाजावर किंवा भागधारकांवर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीनं म्हटलं की अनिल अंबानी साडेतीन वर्षांहून अधिक काळ रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या बोर्डावर नाहीत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
