Anil Ambani News: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा खरेदी होताना दिसत आहे. एकेकाळी ८१ रुपयांच्या स्तरावर असलेला हा शेअर ९९ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. गेल्या गुरुवारी २.९५ रुपयांवर असलेल्या या शेअरनं शुक्रवारी ३ टक्क्यांहून अधिक तेजीसह ३.०६ रुपयांपर्यंत झेप घेतली. शेअरचं क्लोजिंग २.३७% वाढीसह ३.०२ रुपयांवर झालं. रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या कुटुंबाला मिळालेल्या दिलास्यामुळे शेअरमध्ये ही तेजी पाहायला मिळाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी युनियन बँक ऑफ इंडियाचा तो आदेश रद्द केला, ज्यामध्ये उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी यांच्या कंपनीचे बँक खातं 'फ्रॉड' म्हणून घोषित करण्यात आलं होतं. न्यायालयानं स्पष्ट केलं की, अनमोल अंबानी यांना कोणतीही 'कारण दाखवा नोटीस' रितसर बजावण्यात आली नव्हती. ही नोटीस अशा पत्त्यावर पाठवण्यात आली होती, जी जागा कंपनीनं २०२० मध्येच रिकामी केली होती.
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
न्यायालयाचा आदेश आणि निष्कर्ष
न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी आपल्या आदेशात नमूद केलं की, खातं फ्रॉड घोषित करण्यापूर्वी कोणतीही नोटीस बजावण्यात आली नसल्याच्या निष्कर्षावर न्यायालय पोहोचलं आहे. त्यामुळे खात्याचे वादग्रस्त वर्गीकरण आणि घोषणा रद्द करण्यात येत आहे. मात्र, न्यायालयानं हे देखील स्पष्ट केले की, हा आदेश बँकेला नवीन नोटीस जारी करण्यापासून आणि पुढील कारवाई करण्यापासून रोखणार नाही. बँकेला नवीन नोटिसीसोबत सर्व संबंधित कागदपत्रे जय अनमोल अंबानी यांना उपलब्ध करून द्यावी लागतील, जेणेकरून ते आपलं उत्तर सादर करू शकतील. त्यानंतर बँक नवीन आदेश पारित करू शकते. युनियन बँकेनं ऑक्टोबरमध्ये नोटीस आणि सुनावणीशिवाय खातं फसवणूक घोषित करण्याचा निर्णय घेतला होता, जो न्यायाच्या तत्त्वांचं उल्लंघन असल्याचं जय अनमोल अंबानी यांनी याचिकेत म्हटले होते.
सीबीआयनं गुन्हा का नोंदवला?
केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) युनियन बँक ऑफ इंडियाचे सुमारे २२८ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या कथित प्रकरणात जय अनमोल अंबानी आणि रिलायंस होम फायनान्स लिमिटेड (RHFL) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या (तत्कालिन आंध्रा बँक) तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये रिलायन्स होम फायनान्स आणि तत्कालीन संचालक जय अनमोल अंबानी व रवींद्र शरद सुधाकर यांना आरोपी करण्यात आलं आहे. तक्रारीनुसार, कंपनीने बँकेच्या मुंबईतील एससीएफ शाखेतून व्यवसायासाठी ४५० कोटी रुपयांची कर्जाची मर्यादा घेतली होती. हप्त्यांची परतफेड न झाल्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ रोजी हे खातं एनपीए घोषित करण्यात आलं होतं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
