Indo-PAK War Tension: भारत-पाकिस्तान संघर्ष वाढत चालला आहे. पाकच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नसून ते सातत्यानं भारतावर क्षेपणास्त्रं आणि ड्रोन हल्ले करत आहेत. मात्र, स्वदेशी आकाश एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमनं पाकिस्तानचे हे हल्ले हाणून पाडून आपली ताकद दाखवली. 'आकाश'नं पाकिस्तानची संपूर्ण हवा काढली आणि त्यांचे सर्व हल्ले हाणून पाडले. एकीकडे हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या नाकी नऊ आणत असताना दुसरीकडे ते बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात घसरण झाली असली तरी या कंपनीच्या शेअरमध्ये १० टक्क्यांची तेजी दिसून आली.
आकाश एअर डिफेन्स सिस्टीम आणि आकाश वेपन सिस्टीमची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्या म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL). पाकिस्तानच्या हल्ल्यांना आकाश क्षेपणास्त्रानं चोख प्रत्युत्तर देत आपली ताकद दाखवून दिली. दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी या कंपन्यांच्या शेअर्समध्येही जोरदार तेजी दिसून आली.
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
बीएसईवर बीडीएलचा शेअर ९.७३ टक्क्यांनी वधारून १,५९५ रुपयांवर पोहोचला. या शेअरनं १४५५ वर ट्रेडिंग सुरू केलं आणि नंतर त्यात तेजी दिसून आली. मात्र, अखेर तो ५.७९ टक्क्यांनी वधारून १५२८ रुपयांवर बंद झाला. डिफेन्स शेअरमधील तेजीचा परिणाम कंपनीच्या मार्केट कॅपवरही दिसून आला आणि ते वाढून ५६१५० कोटी रुपयांवर पोहोचलं.
BEL शेअरची स्थिती काय?
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दुसऱ्या कंपनीच्या शेअर्समध्येही जोरदार तेजी दिसून आली. शुक्रवारी हा शेअर ३०५ रुपयांवर उघडला आणि ४.८८ टक्क्यांनी वधारून ३२१.८० रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, बाजार बंद झाल्यानंतर त्याची तेजी काहीशी कमी झाली आणि अखेर बीईएलचा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वधारून ३१६.१५ रुपयांवर बंद झाला. विशेष म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत असताना या डिफेन्स शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)