Adani Group Companies IPO: भारत आणि आशियातील दुसरे मोठे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह (Adani Group) हा देशातील तिसरा मोठा औद्योगिक समूह आहे. त्यांच्या समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) आपल्या अनेक सहायक कंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट करण्याची तयारी करत आहे. यामध्ये एअरपोर्ट, मेटल, रोड आणि डेटा सेंटर सारख्या व्यवसायांचा समावेश आहे. हे लिस्टिंग २०२७ ते २०३१ दरम्यान होण्याची अपेक्षा आहे.
ईटीच्या एका अहवालात सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलंय की, पुढील तीन वर्षांत कंपनीचे अनेक मोठे प्रकल्प तयार होतील, ज्यामुळे नवीन लिस्टिंगचा मार्ग मोकळा होईल. यापूर्वी, समूहानं २०१६ ते २०२० दरम्यान अदानी टोटल गॅस (Adani Total Gas), अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आणि अदानी विल्मर (Adani Wilmar) सारख्या कंपन्यांना लिस्ट केलं होतं. एका सूत्राने सांगितले की, २०२७-२८ पर्यंत एअरपोर्ट व्यवसायाची कमाई (EBITDA) सध्याच्या तुलनेत तीनपट होईल. त्याचप्रमाणे, कॉपर आणि इतर मेटल व्यवसायही लिस्टिंगसाठी पूर्णपणे तयार असतील.
गंगा एक्सप्रेसवे आणि रोड प्रोजेक्ट
याच दरम्यान गंगा एक्सप्रेसवे आणि अन्य सात रोड प्रकल्पही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अदानी एंटरप्रायझेसने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अदानी समूह देशात एअरपोर्ट चालवणारा सर्वात मोठा खासगी ऑपरेटर आहे. त्यांच्याकडे आठ एअरपोर्ट आहेत. हा व्यवसाय अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स अंतर्गत येतो, ज्याच्याकडे मुंबई, लखनौ, अहमदाबाद, जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू येथील सात चालू एअरपोर्ट आहेत.
सप्टेंबर तिमाहीत एअरपोर्ट व्यवसायाची कमाई (EBITDA) ₹१,०६२ कोटी रुपये राहिली, जी मागील वर्षाच्या तुलनेत ४३% जास्त आहे. अदानी समूहानं मुंबई, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ आणि गुवाहाटीच्या एअरपोर्टवर ११४ एकरमध्ये सिटी-साइड डेव्हलपमेंटचा पहिला टप्पा सुरू केला आहे. कंपनीचं लक्ष नॉन-एयरो बिझनेसवर आहे, जो कंपनीच्या कमाईत आणि नफ्यात मोठे योगदान देत आहे.
लिस्टिंगचा दुसरा टप्पा
मेटल व्यवसायात अदानी एंटरप्रायझेस पुढील काही वर्षांत वेदांतानंतर दुसरा सर्वात मोठा पोर्टफोलिओ तयार करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. अदानी रोड्स ट्रान्सपोर्टनं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ₹९३० कोटी EBITDA नोंदवला. या व्यवसायानं आपला सातवा प्रकल्प सुरू केला आहे आणि अन्य सात प्रकल्पांवर काम सुरू आहे. अदानी एंटरप्रायझेसमध्ये लिस्टिंगचा हा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्याइतकाच मोठा सिद्ध होण्याची अपेक्षा आहे. यामुळे येणाऱ्या दशकात शेअरधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
