Adani Power : उद्योगपती गौतम अदानी उर्जा क्षेत्रात सातत्याने नवीन गुंतवणूक करत आहेत. अदानी पॉवरने एक महत्त्वाचा व्यवहार करत विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड कंपनीला पूर्णपणे विकत घेतले आहे. हा करार ४,००० कोटी रुपयांना अंतिम झाला असून, आता VIPL ही अदानी पॉवरची १००% मालकीची उपकंपनी बनली आहे. व्हीआयपीएलचा वीज प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे आहे, जिथे कोळशावर आधारित २x३०० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प आहे. गेल्या काही काळापासून VIPL दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात होती. अदानीच्या पुनरुज्जीवन योजनेला NCLT ने १८ जून रोजी मंजुरी दिली आणि ७ जुलै २०२५ रोजी हा करार पूर्ण झाला.
वीज निर्मिती वाढवण्याचे अदानीचे लक्ष्य
या अधिग्रहणामुळे अदानी पॉवरची एकूण वीज निर्मिती क्षमता आता १८,१५० मेगावॅटवर पोहोचली आहे. कंपनीने २०२९-३० पर्यंत ही क्षमता ३०,६७० मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. तोट्यात असलेल्या किंवा अडचणीत सापडलेल्या वीज कंपन्यांना पुन्हा उभं करून देशाची विजेची गरज पूर्ण करणे, हे अदानी पॉवरचे ध्येय आहे. VIPL ची खरेदी याच धोरणाचा एक भाग आहे.
"प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं स्वप्न!" - अदानी पॉवरचे सीईओ
या अधिग्रहणाबद्दल बोलताना अदानी पॉवरचे सीईओ एस.बी. ख्यालिया म्हणाले, "VIPL ची खरेदी आमच्यासाठी एक मोठी संधी आहे. आम्हाला अशा कंपन्यांना पुन्हा सक्षम करून देशाला स्वस्त आणि विश्वासार्ह वीज पुरवायची आहे. आमचं स्वप्न प्रत्येक घरात वीज पोहोचवून भारताच्या वेगाने होणाऱ्या विकासाला हातभार लावण्याचं आहे."
वाचा - शेअर, सोने, बाँड्स... सगळं एकाच ठिकाणी? म्युच्युअल फंडाची 'ही' श्रेणी तुमच्यासाठी बेस्ट!
अधिग्रहणानंतरही अदानी पॉवरच्या शेअर्सवर दबाव
विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या अधिग्रहणाच्या मोठ्या बातमीनंतरही अदानी पॉवरच्या शेअर्सवर मात्र दबाव दिसून येत आहे. सध्या शेअर बाजारात अदानी पॉवरचा शेअर ०.५२% च्या घसरणीसह ५९४.०५ रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये या शेअरने १७.६५% चा सकारात्मक परतावा दिला आहे, तर या वर्षात आतापर्यंत १२.८०% वाढ झाली आहे. मात्र, गेल्या एका वर्षाचा विचार केल्यास या शेअरने १४% पेक्षा जास्त नकारात्मक परतावा दिला आहे.