Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सत्ताधारी एनडीए युती स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असतानाच, त्याचे थेट पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. एकीकडे बाजार निर्देशांक मोठ्या घसरणीसह लाल निशाणीवर ट्रेड करत असताना, दुसरीकडे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मात्र तेजी दिसून आली आहे.
ही तेजी विशेष महत्त्वाची आहे, कारण बिहारच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी 'अदानी पॉवर प्लांट'च्या जमीन वाटपाचा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला होता. एनडीएच्या स्पष्ट विजयाच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीमुळे, गुंतवणूकदार या निकालाला समूहासाठी एक सकारात्मक राजकीय संकेत म्हणून पाहत आहेत.
दोन शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक
- या तेजीमध्ये अदानी समूहाच्या दोन कंपन्यांनी बाजाराच्या विपरीत जाऊन मागील ५२ आठवड्यांतील सर्वात उच्चांक गाठला.
- अदानी पोर्ट्स ॲन्ड स्पेशल इकोनॉमिक झोन या प्रमुख कंपनीच्या शेअरमध्ये १ टक्क्यांहून अधिक दमदार वाढ झाली. शेअरची किंमत १,५२३.४५ रुपये या ५२ आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले.
- अदानी एनर्जी सोल्युशन्स या एनर्जी क्षेत्रातील कंपनीच्या शेअरनेही १ टक्क्यांहून जास्त उसळी घेतली आणि १,०५० रुपयांच्या महत्त्वाच्या स्तरावर नवीन शिखर गाठले.
प्रमुख कंपन्यांमध्येही तेजी
अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरने २ टक्क्यांहून अधिक तेजी दाखवली आणि २,५५३ रुपयांच्या स्तरावर व्यवहार केला. तर अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्येही सुमारे २ टक्के वाढ झाली आणि तो ६३५.१० रुपयांवर पोहोचला.
बाजार घसरणीत अडकला
अडानी समूहाचे शेअर्स तेजीत असले तरी, भारतीय शेअर बाजाराचा मूड मात्र नकारात्मक होता. दुपारी २ वाजेपर्यंत बीएसईचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स ३७६ अंकांनी (०.४४%) मोठ्या घसरणीसह ८४,१०२.९६ वर ट्रेड करत होता. तर एनएसईचा निफ्टीही ११०.७१ अंकांनी (०.४२%) तुटून २५,७७१.४० च्या स्तरावर आला होता.
वाचा - टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
राजकीय निकालाचा बाजारावर परिणाम
बिहार निवडणुकीत विरोधी पक्षांनी भागलपूर जिल्ह्यातील पीरपैंती येथील अदानी पॉवर प्लांटसाठी 'कवडीमोल' दराने जमीन वाटप केल्याचा मुद्दा उचलला होता. आता ज्या सत्तारूढ आघाडीने (एनडीए) ही जमीन वाटप केली होती, तीच आघाडी पुन्हा सत्तेत येत असल्याचे स्पष्ट होत आहे. याच सकारात्मक धारणेमुळे अदानींच्या शेअर्सना आज तेजी मिळाली.
