Share Market : पाकिस्तानची अवस्था सध्या इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. भारतीय सैन्याच्या ओपरेशन सिंदूरमध्ये सपाटून मार खाल्लेल्या पाकिस्तानला घरातूनही मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी कराची शेअर बाजार ७ टक्क्यांनी घसरला. घसरण थांबत नसल्याने शेवटी व्यवहार थांबवण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली. याउलट भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम जाणवला नाही. आज सकाळी तणावाच्या वातावरणात व्यापार सत्र सुरू झाले. सुरुवातीच्या व्यवहारातच मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्स ५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि निफ्टीमध्येही घसरण दिसून आली. आज बाजारात अस्थिरता असली तरी, कोणतीही मोठी घसरण झालेली नाही. यामागे ३ मोठी कारणे आहेत.
भारतीय लष्कराची ताकद
भारत आणि पाकिस्तानमधील हल्ल्यांच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पण, भारतीय सैन्यदलाची ताकद आणि त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे त्यांना दिलासाही मिळत आहे. बाजारातील तज्ज्ञ म्हणतात की, अशा परिस्थितीत कोणताही शेअर बाजार कोसळू शकतो. पण, पाकिस्तानविरोधात भारताची ताकद जास्त असल्याचे सर्वजण जाणतात. पाकिस्तानमध्ये भारतासोबत फार काळ संघर्ष करण्याची क्षमता नाही. त्यांची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली आहे. तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याने गुंतवणूकदार बाजारावर विश्वास ठेवून आहेत.
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढतेय
भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. व्याजदर कमी करण्यात आले असून महागाई नियंत्रणात आहे. अलिकडेच, कोटक अल्टरनेट अॅसेट मॅनेजर्सच्या एका अहवालात म्हटले आहे, की येत्या काही महिन्यांत जागतिक आर्थिक वाढ मंदावण्याची शक्यता आहे. यामध्ये चीन आणि अमेरिका सारख्या प्रमुख अर्थव्यवस्था मंदीचा सामना करतील. परंतु, या काळात भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान टिकवून ठेवू शकेल. यासोबतच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एप्रिल २०२५ च्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनात दिलेल्या माहितीनुसार, भारताचा जीडीपी २०२५ मध्ये जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
गुंतवणूकदारांना भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास
परदेशी गुंतवणूकदारांनाही भारतीय बाजाराबद्दल विश्वास आहे. गेल्या १६ व्यापार सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय समभागांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे. यावरून भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांचा किती विश्वास आहे हे दिसून येते. म्हणूनच बाजारात कोणतीही मोठी घसरण झालेली नाही.
वाचा - 'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)