America-India Trade Deal: भारत आणि अमेरिका व्यापार करार करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू होती. आता स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (०१ जून २०२५) याची पुष्टी केली. ट्रम्प यांनी संकेत दिले की, भारत अमेरिकन कंपन्यांवरील कर कमी करण्यास तयार आहे, ज्यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्याची संधी मिळेल.
...तर अमेरिका व्यापार करार करेल
एअर फोर्स वनमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, 'मला वाटते की, आमचा भारतासोबत वेगळ्या प्रकारचा व्यापार करार होईल. असा करार ज्यामध्ये आम्ही भारतात जाऊन खुलेपणाने स्पर्धा करू शकू. भारताने आतापर्यंत परदेशी कंपन्यांसाठी बाजारपेठ उघडली नव्हती, परंतु आता त्यात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर भारताने असे केले, तर अमेरिका कमी करासह एक मजबूत व्यापार करार करेल.'
#WATCH | On trade deals with India, US President Donald Trump says, "I think we are going to have a deal with India. And that is going to be a different kind of a deal. It is going to be a deal where we are able to go in and compete. Right now, India does not accept anybody in. I… pic.twitter.com/6c199NGm8B
— ANI (@ANI) July 1, 2025
यापूर्वी भारतावर लावलेले २६% आयात शुल्क
डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी भारतावर २६% कर (आयात शुल्क) लादण्याची घोषणा केली होती, जी ९० दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तथापि, किमान १०% कर अजूनही लागू आहे. जर दोन्ही देशांदरम्यान हा करार झाला, तर व्यापार संबंधांमध्ये हा एक मोठे वळण ठरू शकते.
दुग्धव्यवसायाबद्दल भारताची कडक भूमिका
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने अमेरिकन उत्पादनांसाठी आपला दुग्ध बाजार खुला करावा असे अमेरिकेला वाटते, परंतु भारताने स्पष्ट केले आहे की, ते या मागणीवर तडजोड करणार नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुग्धव्यवसायावर सवलतीचा प्रश्नच उद्भवत नाही. ही आमच्यासाठी लाल रेषा आहे. भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्रात सुमारे ८ कोटी लोक रोजगार करतात, ज्यापैकी बहुतेक लहान शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत, सरकारला या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची सवलत देणे शक्य नाही.
करार पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारतीय अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गेल्या आठवड्यापासून सोमवारपर्यंत वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन प्रशासनाशी चर्चा करत होते. विशेष सचिव राजेश अग्रवाल हे भारतातील या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असून, त्यांनी गतिरोध दूर करण्यासाठी त्यांचा दौरा आणखी एक दिवस वाढवला आहे.