Silver Price : चांदीच्या दराने सध्या परताव्याच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी चांदीच्या किमती ६४.३१ डॉलर प्रति औंस या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या. भारतातही अनेक शहरांमध्ये चांदीने २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत चांदीच्या दरात १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, ज्यामुळे परतावा देण्याच्या बाबतीत तिने सोने आणि शेअर बाजार या दोघांनाही मागे टाकले आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात चांदीकडे आकर्षित होत आहेत. तुम्हीही चांदीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत.
कधी धोका देईल सांगता येत नाही
गुंतवणुकीच्या जगात चांदीला अनेकदा “डेव्हिल्स मेटल” असे म्हटले जाते. चांदीला हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे, तिच्या किमतीत जेवढी वेगाने वाढ होते, तितक्याच वेगाने ही वाढ गायब होते. त्यामुळे सोने हे कायमच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिले आहे, पण चांदी नाही. मागील ५० वर्षांच्या इतिहासात चांदीने केवळ तीन वेळाच मोठी झेप घेतली आहे. पण, प्रत्येक वेळी या झेपेनंतर गुंतवणूकदारांना दीर्घकाळ मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
१९८० ची 'हंट ब्रदर्स' गाथा
नेल्सन आणि विल्यम हंट या दोन अमेरिकन अब्जाधीश भावांनी १९८० मध्ये संपूर्ण बाजारपेठेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जगातील जवळपास एक तृतीयांश चांदी विकत घेतली. परिणामी चांदीचा दर ६ डॉलरवरून ४९ डॉलर प्रति औंसवर पोहोचला. मात्र, हंट भावांनी चांदीच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टला तारण ठेवून बाजारामधून पैसे उधार घेतले. जेव्हा अमेरिकी नियामकांनी मार्जिनवर नवीन फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट खरेदी करण्यावर बंदी घातली, तेव्हा हंट भावांचा खेळ संपुष्टात आला. २७ मार्च १९८० रोजी त्यांना मार्जिन कॉल पूर्ण करता आला नाही आणि एकाच दिवसात किंमत ५०% हून अधिक कोसळली. या घटनेनंतरच चांदीला 'डेव्हिल्स मेटल' हे नाव पडले.
२०११ चे कर्ज संकट
हंटच्या कारस्थानानंतर दुसरी मोठी झेप येण्यास तब्बल ३१ वर्षे लागली. २०११ मध्ये अमेरिकेचे वाढते कर्ज संकट आणि जागतिक बाजारपेठेतील भीतीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने-चांदीकडे वळले. चांदीचा दर पुन्हा एकदा १९८० च्या विक्रमी पातळीच्या आसपास, म्हणजेच ५० डॉलर प्रति औंस वर पोहोचला. अमेरिकेचे कर्ज संकट निवळताच अवघ्या ६ महिन्यांत चांदीच्या किमती ३०% हून अधिक खाली आल्या. त्यानंतर पुढील १४ वर्षे चांदी कधीही त्या पातळीजवळ पोहोचू शकली नाही.
औद्योगिक मागणीचा आधार
चांदीचा दर तिसऱ्यांदा ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, यावेळी तेजीचे कारण वेगळे आहे. १९८० मध्ये सट्टेबाजी आणि २०११ मध्ये सुरक्षित गुंतवणुकीची मागणी होती, पण यावेळी औद्योगिक मागणी वाढल्यामुळे किंमत वाढत आहे. सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात चांदीची मागणी झपाट्याने वाढली आहे. याव्यतिरिक्त, भू-राजकीय तणाव आणि डॉलरमधील कमजोरीमुळेही दरांना आधार मिळत आहे.
वाचा - तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
चांदीचा इतिहास पाहता, या तेजीमध्ये गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक आणि सावधगिरीने गुंतवणूक करावी, असा सल्ला बाजार विश्लेषकांनी दिला आहे. ही तेजी टिकाऊ आहे की नाही, हे भविष्यात स्पष्ट होईल.
