Silver ETF : गेल्या वर्षभरात मौल्यवान धातूंच्या बाजारात सोन्यापेक्षाही चांदीनेगुंतवणूकदारांना अधिक भुरळ घातली आहे. 'ईटी म्युच्युअल फंड'च्या विश्लेषणानुसार, चांदीवर आधारित ईटीएफ आणि फंड्सनी गेल्या एका वर्षात तब्बल १८८ टक्क्यांपर्यंत बंपर परतावा दिला आहे. मात्र, या अभूतपूर्व तेजीनंतर आता बाजार तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना 'सावध' राहण्याचा इशारा दिला आहे.
१८८% परतावा देणारे टॉप फंड्स
चांदीवर आधारित फंड्सच्या श्रेणीत सध्या २१ फंड्स कार्यरत आहेत. त्यात टाटा सिल्वर ईटीएफने १८८.४८% परतावा देऊन अव्वल स्थान पटकावले आहे, तर टाटा सिल्वर ईटीएफ एफओएफने १७६.७९% परतावा दिला आहे. औद्योगिक मागणी आणि जागतिक पुरवठ्यातील तुटवडा यामुळे या फंड्समध्ये ३,९६२ कोटी रुपयांची नवी गुंतवणूक आली आहे.
तज्ज्ञांचा 'नफा वसुली'चा सल्ला
तज्ज्ञांच्या मते, २०० टक्क्यांच्या आसपास वाढ झाल्यानंतर सध्याच्या उच्च स्तरावर मोठी गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते.
- फोमोपासून सावध राहा : "लोक अनेकदा संधी हुकेल या भीतीने घाईघाईत गुंतवणूक करतात, पण आता सतर्क राहण्याची वेळ आहे," असे तज्ज्ञ सांगत आहेत.
- पोर्टफोलिओ रिबॅलेंसिंग : ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये चांदीचे प्रमाण खूप जास्त झाले आहे, त्यांनी थोडा नफा बुक करून आपले भांडवल सुरक्षित करावे.
नजीकच्या काळातील जोखीम
'फिसडम'चे रिसर्च हेड सागर शिंदे यांनी स्पष्ट केले की, चांदीची दीर्घकालीन 'स्टोरी' अजूनही भक्कम आहे. सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्समधील औद्योगिक वापरामुळे चांदीची मागणी वाढतच राहणार आहे. मात्र, नजीकच्या काळात किमतीत मोठी दुरुस्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, ज्यांना मोठा नफा झाला आहे, त्यांनी 'पार्शिअल प्रॉफिट बुकिंग' करणे फायद्याचे ठरेल.
नवीन गुंतवणूकदारांनी काय करावे?
जर तुम्ही आता चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तज्ज्ञांनी खालील दोन महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
एकरकमी गुंतवणूक टाळा : सध्याच्या किमती खूप जास्त असल्याने मोठी रक्कम एकदम गुंतवू नका.
हळूहळू गुंतवणूक : बाजार जेव्हा थोडा खाली येईल, तेव्हा तुकड्या-तुकड्याने गुंतवणूक करणे अधिक समजदारीचे ठरेल. यामुळे सरासरी खरेदी किंमत कमी होईल आणि जोखीम मर्यादित राहील.
वाचा - आयटी कंपन्यांवर 'नव्या लेबर कोड'ची संक्रांत! TCS, इन्फोसिसच्या नफ्यात मोठी घट; काय आहे कारण?
थोडक्यात महत्त्वाचे
- दीर्घकालीन आधार : सोलर आणि ईव्ही सेक्टरमुळे अजूनही मजबूत.
- नजीकचा कल : उच्च स्तरावर नफावसुलीमुळे दबाव.
- धोरण : जुन्या गुंतवणूकदारांनी नफा बुक करावा, नव्यांनी वाट पाहून हळूहळू गुंतवणूक करावी.
