Rich Dad Poor Dad : 'रिच डॅड पुअर डॅड' या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा चांदीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कियोसाकी यांनी चांदीच्या किमतीत होणारी वाढ ही केवळ सुरुवात असून, आगामी वर्षात चांदी ऐतिहासिक उच्चांक गाठेल, असा दावा केला आहे. त्याचबरोबर, त्यांनी दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या हवाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेबाबत गंभीर इशाराही दिला आहे.
चांदीसाठी २०० डॉलर्सचे नवीन 'टार्गेट'
कियोसाकी यांनी त्यांच्या नव्या पोस्टमध्ये चांदीच्या किमतीबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ७० डॉलर प्रति औंसच्या वर गेली आहे. ही वाढ २०२६ पर्यंत २०० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. "सोने-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, पण जे लोक डॉलरसारख्या 'फेक मनी' वर विसंबून आहेत, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे," असे कियोसाकी यांनी म्हटले आहे.
डॉलरच्या घसरणीमुळे 'हायपर-इन्फ्लेशन'ची भीती
कियोसाकी यांच्या मते, अमेरिकन डॉलरची ताकद सतत कमी होत चालली आहे. ७० डॉलरची चांदी हे आगामी ५ वर्षांतील हायपर-इन्फ्लेशन (प्रचंड महागाई) चे लक्षण असू शकते. "पराभूत खेळाडू बनू नका, डॉलरची व्हॅल्यू सतत कमी होत राहणार आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि प्रत्यक्ष मालमत्तेत गुंतवणूक करा," असा सल्ला त्यांनी दिला आहे.
भारतीय बाजारात चांदीचा 'कहर'
जागतिक बाजाराप्रमाणेच भारतातही चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, बुधवारी एकाच दिवसात चांदीच्या दरात ७,९८३ रुपयांची मोठी उसळी आली. मंगळवारी २,११,००० रुपये प्रति किलोवर बंद झालेली चांदी बुधवारी २,१८,९८३ रुपयांच्या नव्या उच्चांकावर स्थिरावली.
वाचा - गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
वॉरेन बफे आणि 'धोकादायक' काळ
गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांच्या विचारांचा दाखला देत कियोसाकी यांनी म्हटले की, आपण सध्या अत्यंत धोकादायक काळात जगत आहोत. "बफे यांच्या मते, एआय बबल (फुगा), शेअर बाजारातील अस्थिरता आणि जागतिक कर्ज हे आपल्या आयुष्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी सर्वात मोठे धोके आहेत. भविष्यातील संकटांपासून वाचण्यासाठी बफे यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन ऐकणेच हिताचे ठरेल," असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
