Rent vs Buy Debate : देशातील अनेक लोकांसाठी स्वतःचे घर घेणे हे आयुष्यातील सर्वात मोठे आर्थिक स्वप्न असते. मात्र, आर्थिक सल्लागार आणि माजी बँकर शरण हेगडे यांनी या पारंपरिक विचारांना आव्हान दिले आहे. त्यांच्या मते, 'स्वतःचे घर विकत घेण्याऐवजी भाड्याने राहणे' हे गुंतवणुकीच्या दृष्टीने अधिक फायदेशीर असून, यातून तुम्ही करोडपती बनू शकता त्यांनी एका यूट्यूब व्हिडिओमध्ये आकडेवारीसह हा विचार मांडला आहे, ज्यामुळे अनेक घर खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांना धक्का बसू शकतो.
'१ कोटीचे घर घेणे' सर्वात वाईट आर्थिक निर्णय
शरण हेगडे यांच्या मते, भारतात घर खरेदी करणे हे एक मोठे आर्थिक उद्दिष्ट मानले जाते, पण १ कोटी रुपयांचे घर खरेदी करणे हा नोकरदार लोकांसाठी सर्वात वाईट आर्थिक निर्णय असू शकतो. ते म्हणतात, "मी गेल्या १० वर्षांत भाड्यापोटी १ कोटींहून अधिक खर्च केले आहेत आणि मला एका रुपयाचाही पश्चात्ताप नाही. कारण ९९% घर खरेदीदार जे गणित करत नाहीत, ते मी केले आहे."
घर खरेदीचा खर्च दुप्पट होतो
हेगडे यांनी घर खरेदी करताना होणारा वास्तविक खर्च मांडला आहे.
- व्याज: १ कोटी रुपयांचे घर ईएमआयवर घेतल्यास, सुमारे ९० लाख रुपये केवळ व्याजापोटी भरावे लागतात.
- अतिरिक्त खर्च: मुद्रांक शुल्क आणि इतर खर्च मिळून १० लाख रुपये लागतात.
- देखभाल: २० वर्षांत घराच्या देखभालीवर किमान २० लाख रुपये खर्च होतात.
- एकूण खर्च: अशा प्रकारे, घराची एकूण किंमत २ कोटी रुपयांहून अधिक होते.
जर २० वर्षांत त्या मालमत्तेची किंमत वाढून ४ कोटी रुपये झाली तरी, महागाई समायोजित केल्यावर मिळणारा खरा नफा खूप कमी असतो, असे हेगडे यांचे म्हणणे आहे.
भाड्याने राहण्याचा 'डबल फायदा'
- भाड्याने राहण्याची तुलना करताना हेगडे सांगतात की, भाड्याने राहणे हे घर विकत घेण्यापेक्षा खूपच स्वस्त आहे आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने 'डबल फायदा' देते.
- जर तुम्ही २० वर्षांपर्यंत दरमहा २५,००० रुपये भाडे देत असाल (भाड्यामध्ये वार्षिक वाढ गृहीत धरल्यास), तर तुमचा एकूण खर्च सुमारे १.१२ कोटी रुपये होतो.
- हा खर्च घर खरेदीच्या एकूण खर्चापेक्षा (सुमारे २.२० कोटी) खूप कमी आहे.
गुंतवणुकीतून करोडपती
- घरासाठी लागणारे २० लाख रुपये डाउन पेमेंट आणि ईएमआयमध्ये बचत होणारी रक्कम, ही दरवर्षी केवळ १२% परतावा देणाऱ्या SIP मध्ये गुंतवल्यास, २० वर्षांत ती रक्कम वाढून ४.६ कोटी रुपये होऊ शकते.
- हेगडे यांच्या मते, घर खरेदीच्या तुलनेत हा ३.१ कोटींचा मोठा निव्वळ फायदा आहे. जर हा परतावा १८% मिळाला तर हा फरक ८.५ कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो.
- म्हणजे, भाड्याने राहून बचत केलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवून तुम्ही सहजपणे घर मालक होण्याच्या खर्चापेक्षा जास्त संपत्ती निर्माण करू शकता.
वाचा - निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
(टीप: हेगडे यांचे मत एक गुंतवणूक धोरण म्हणून मांडले गेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक गरजा आणि गुंतवणुकीची उद्दिष्टे वेगळी असू शकतात. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)
