RBI Gold : भारतात मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली जाते. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित आणि विश्वासार्ह मानली जाते. आतापर्यंतचे ट्रेंड पाहता, सोन्याने नेहमी चांगला परतावा दिला आहे. भारतातील बहुतांश महिला सोने खरेदी करण्यात रस दाखवतात. विशेष म्हणजे, जगात जेव्हा जेव्हा मंदी येते, तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियादेखील याच सोन्यात गुंतवणूक करते. RBI ने नोव्हेंबर 2024 मध्ये 8 टन सोनं खरेदी करुन एक नवीन विक्रम केला आहे. यासह भारताचा एकूण सोन्याचा साठा 876 टनांवर पोहोचला आहे. भारताचा सोन्याचा साठा सध्या सरासरीपेक्षा कैक पटीने जास्त आहे.
महागाईच्या काळात सोनं खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या चांगले मानले जाते. याशिवाय, नोटाबंदीच्या वेळीही त्याचे मूल्य अबाधित राहिले. जेव्हा जगात आर्थिक अस्थिरतेचा काळ येतो, तेव्हा सोन्याचीच साथ मिळते. जागतिक किंवा स्थानिक आर्थिक संकटाच्या काळात सोन्याच्या किमती वाढतात. जेव्हा बाजार अस्थिर असतात आणि इक्विटी मार्केटमध्ये अनिश्चितता असते, तेव्हा सोने खरेदी करणे फायदेशीर व्यवहार मानला जातो.
गेल्या वर्षी इतके सोने खरेदी केले
2024 मध्ये आरबीआयने मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली आहे. नोव्हेंबरमध्ये 8 टन सोने खरेदी करण्याबरोबरच, RBI ने एकूण 73 टन सोने खरेदी केले आहे. एवढ्या मोठ्या खरेदीनंतर भारताचा सोन्याचा साठा 876 टन झाला. सोने खरेदीत RBI ने नॅशनल बँक ऑफ पोलंड (NBP) नंतर दुसरे स्थान मिळवले आहे. पोलंड सर्वाधिक सोने खरेदी करतो. नोव्हेंबरमध्ये त्यांनी 21 टन सोने खरेदी केले आणि वर्षभरातील त्यांची एकूण खरेदी 90 टन झाली. यानंतर चीनचा नंबर लागतो. चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनानेही नोव्हेंबरमध्ये 5 टन आणि वर्षभरात एकूण 34 टन सोन्याची खरेदी केली आहे. सध्या चीनकडे एकूण 2,264 टन सोन्याचा साठा आहे.
सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ
जगभरात चालू असलेल्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, सेंट्रल बँक सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून आपला राखीव निधी वाढवत आहे. या दिशेने भारत सोन्याची खरेदी करून सोन्याचा साठा वेगाने वाढवत आहे. या खरेदीमुळे देश आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याचे सिद्ध होते.