Post Office Investment Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील काही हिस्सा अशा ठिकाणी गुंतवू इच्छिते जिथे पैसा सुरक्षित राहील आणि त्यावर चांगला परतावा मिळेल. विशेषतः निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू नये आणि नियमित उत्पन्नाची सोय व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. या दृष्टीनं पोस्ट ऑफिसच्या बचत योजना अत्यंत लोकप्रिय आहेत. यामध्ये 'पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना' (SCSS) विशेष लक्षवेधी ठरत असून, ती अनेक बँकांच्या एफडीपेक्षा जास्त व्याज देत आहे.
गुंतवणुकीवर सरकारची सुरक्षा हमी
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केलेल्या गुंतवणुकीला स्वतः सरकार सुरक्षिततेची हमी देते. पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेविंग्स स्कीममध्ये मोठ्या बँकांच्या एफडीच्या तुलनेत अधिक व्याजदर मिळतो. या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिक दरमहा २०,००० रुपयांपर्यंतचे नियमित उत्पन्न मिळवू शकता. या सरकारी योजनेत केवळ १००० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येते.
८.२% दरानं मिळतंय जोरदार व्याज
या योजनेअंतर्गत सरकार १ जानेवारी २०२४ पासून गुंतवणूकदारांना ८.२ टक्के दरानं आकर्षक व्याज देत आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्नासोबतच या योजनेत कर सवलतीचा लाभही मिळतो. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती स्वतःच्या नावावर किंवा जोडीदारासोबत संयुक्त खातं उघडू शकते.
काही विशेष प्रकरणांमध्ये वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. 'व्हीआरएस' (VRS) घेणाऱ्या व्यक्तीचं वय ५५ ते ६० वर्षांच्या दरम्यान असू शकते, तर संरक्षण दलातून निवृत्त झालेले कर्मचारी ५० ते ६० वर्षांच्या दरम्यान गुंतवणूक करू शकतात. मात्र, यासाठी काही अटी लागू आहेत.
दरमहा २०,००० रुपये कमाईचं गणित
या योजनेत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास ८.२ टक्के व्याजदराप्रमाणे गुंतवणूकदाराला वार्षिक २.४६ लाख रुपये व्याज मिळते. ही व्याजाची रक्कम महिन्याला विभागली तर ती साधारणपणे महिन्याला २०,००० रुपये होते. दरवर्षी एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला व्याजाची रक्कम दिली जाते. जर मुदत पूर्ण होण्यापूर्वी खातेदाराचा मृत्यू झाला, तर खातं बंद केलं जातं आणि सर्व रक्कम कागदपत्रांमध्ये नोंदवलेल्या वारसाला सोपवली जाते.
