Post Office Scheme :पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळत नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र, जर योग्य नियोजन करून गुंतवणूक केली, तर या योजनांमध्येही जोखीममुक्त आणि चांगला परतावा मिळवता येतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अशाच योजनेबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला भविष्यात एक मोठी रक्कम मिळवून देऊ शकते.
या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना आहे. या योजनेत सध्या ८.२ टक्के व्याज दिले जात असून ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे.
दरवर्षी किती रक्कम जमा करता येते?
ही योजना तुम्ही तुमच्या १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने उघडू शकता, ज्यामुळे तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या खर्चाची सोय होऊ शकते. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही वर्षाला किमान २५० रुपये पासून ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींसाठी हे खाते उघडता येते. मात्र, जर जुळ्या मुली असतील तर तीन मुलींसाठी खाते उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाते उघडल्यापासून पुढील १५ वर्षांपर्यंत यात पैसे जमा करता येतात. जर एखाद्या आर्थिक वर्षात खात्यात किमान २५० रुपये जमा केले नाहीत, तर ते खाते 'डिफॉल्ट' होईल. मात्र, पुढील १५ वर्षांच्या आत दंड भरून ते पुन्हा सुरू करता येते.
पैसे कधी काढता येतात? आणि मुदतपूर्ती कधी होते?
मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचे पालक हे खाते चालवू शकतात. पण, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर किंवा १० वी उत्तीर्ण झाल्यावर या खात्यातून काही प्रमाणात पैसे काढता येतात. मुदतपूर्तीपूर्वी एकरकमी पैसे काढण्याची परवानगी नाही, मात्र वर्षातून एकदा हप्त्यांमध्ये पैसे काढता येतात.
हे खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी त्याची मुदतपूर्ती होते, पण तुम्हाला फक्त १५ वर्षांपर्यंतच पैसे जमा करायचे आहेत. याशिवाय, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिच्या लग्नाच्या वेळीही या खात्याची मुदतपूर्ती करता येते.
४०० रुपयांपासून ७० लाखांपर्यंतचा प्रवास
जर तुम्हाला तुमच्या मुलीसाठी या योजनेतून मुदतपूर्तीनंतर सुमारे ७० लाख रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला दररोज सुमारे ४०० रुपयांची बचत करावी लागेल. अशाप्रकारे, तुम्ही दर महिन्याला १२,५०० रुपये आणि वर्षाला १.५ लाख रुपये जमा कराल.
वाचा - ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा
समजा, तुम्ही तुमच्या ५ वर्षांच्या मुलीच्या नावाने हे खाते उघडले आणि पुढील १५ वर्षांपर्यंत दरवर्षी १.५ लाख रुपये जमा केले, तर मुदतपूर्तीनंतर म्हणजेच २१ वर्षांनी तुमच्या मुलीच्या खात्यात एकूण ६९,२७,५७८ रुपये जमा होतील. यात तुमची एकूण गुंतवणूक २२,५०,००० रुपये असेल, तर फक्त व्याजातून तुम्हाला ४६,७७,५७८ रुपयांची कमाई होईल. ही संपूर्ण रक्कम करमुक्त असेल.