Post Office Investment Scheme: सध्या अनेक जण गुंतवणूकीकडे वळत आहेत. पारंपारिक गुंतवणूकीला आजही अनेक जण महत्त्व देतात. आज आपण पोस्टाच्या एका स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसमध्ये 'नॅशनल सेव्हिंग्स रिकरिंग डिपॉझिट' ही एक बचत योजना आहे, जी एक विश्वासार्ह आणि सुरक्षित बचत योजना आहे. ही योजना भारतीय पोस्ट विभागातर्फे चालवली जाते. दर महिन्याला थोडी-थोडी रक्कम गुंतवून, एका निश्चित कालावधीनंतर चांगले रिटर्न मिळवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही योजना उत्तम आहे. नियमित मासिक बचत, तिमाही चक्रवाढ व्याज आणि सरकारी हमी यामुळे ही योजना खास ठरते. ही योजना विशेषतः नोकरदार, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी उपयुक्त आहे, जे कमी जोखमीमध्ये सुरक्षित भविष्याची योजना आखू इच्छितात.
योजनेची माहिती
पात्रता: कोणताही भारतीय नागरिक (सिंगल, जॉईंट अकाऊंट किंवा अल्पवयीन मुलाच्या नावानं पालकाद्वारे खातं उघडू शकतो).
किमान ठेव: दरमहा फक्त ₹१०० (त्यानंतर ₹१० च्या पटीत). ठेवण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.
ठेवीचा कालावधी: ५ वर्षे (६० महिने), हा कालावधी निश्चित आहे.
व्याज दर: ६.७% प्रति वर्ष (सप्टेंबर २०२५ पर्यंत). सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याजाची गणना तिमाही चक्रवाढ पद्धतीने केली जाते, ज्यामुळे तुमचा रिटर्न वेगानं वाढतो.
ठेव जमा करण्याची योग्य वेळ: प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला किंवा त्यापूर्वी.
कर्ज सुविधा: खातं उघडल्यानंतर १ वर्षानंतर, जमा केलेल्या रकमेच्या ५०% पर्यंत कर्ज घेण्याची सुविधा.
कर लाभ: या योजनेवर सध्या कोणताही कर लाभ उपलब्ध नाही (हे कलम ८०सी अंतर्गत येत नाही).
₹१,१३,६५८ चा हमी परतावा
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दरमहा ₹१०,००० गुंतवले, तर, मॅच्युरिटीनंतर म्हणजेच ५ वर्षांनी तुम्हाला ₹१,१३,६५८ चा हमी परतावा मिळेल. या गणितानुसार, पाच वर्षांत तुम्ही एकूण ₹६,००,००० गुंतवणूक करता, ज्यावर तुम्हाला ₹१,१३,६५८ व्याज म्हणून मिळेल. म्हणजेच, त्यावेळी तुमच्याकडे एकूण ₹७,१३,६५८.२९ चा फंड तयार होईल.
महत्त्वाचे नियम आणि सुविधा
मासिक ठेव चुकल्यास: जर तुम्ही एखाद्या महिन्यात पैसे जमा करू शकला नाहीत, तर प्रत्येक ₹१०० वर ₹१ दंड आकारला जाईल.
खातं पुन्हा सुरू करणं: सलग जास्तीत जास्त ४ वेळा हप्ते चुकवण्याची परवानगी आहे. जर सलग ४ वेळा हप्ते चुकले, तर खातं बंद केलं जाऊ शकतं, परंतु तुमच्याकडे ते पुन्हा सुरू करण्याचा पर्याय असतो.
वेळेआधी खाते बंद करणं: खातं उघडल्यानंतर ३ वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही ते बंद करू शकता. जर तुम्ही ३ वर्षांच्या आधी खातं बंद केलं, तर तुम्हाला पोस्टल सेव्हिंग्स अकाउंटच्या व्याज दराइतकंच व्याज मिळेल, जे कमी असते. १० वर्षांवरील कोणतंही मूल स्वतःचं खातं उघडू आणि चालवू शकतं. लहान मुलांसाठी खातं त्यांचे पालक उघडू शकतात.