Post Office MIS Scheme : दिवाळीत अनेकजण नवीन वस्तूंची खरेदी करतात. तर काहीजण या शुभमुहूर्तावर गुंतवणुकीचा श्रीगणेशा करतात. तुम्ही सुरक्षित आणि निश्चित उत्पन्नाची हमी देणारी गुंतवणूक शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत तुम्हाला एकदाच मोठी रक्कम गुंतवावी लागते आणि त्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला निश्चित व्याजाची रक्कम जमा होते. यामुळे निवृत्त झालेले लोक किंवा ज्यांना नियमित मासिक उत्पन्नाची गरज आहे, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते.
विशेष म्हणजे, ही योजना तुम्ही तुमच्या पत्नीसोबत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसोबत संयुक्त खाते म्हणूनही उघडू शकता, ज्यामुळे मासिक उत्पन्नाची मर्यादा वाढते.
गुंतवणूक मर्यादा आणि व्याजदर
सध्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत ७.४% वार्षिक दराने व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी १,००० भरून खाते उघडू शकता. यात तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. दोन किंवा तीन लोकांसोबत संयुक्त खाते उघडल्यास, त्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
तुमचे मासिक उत्पन्न किती?
जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मिळून मासिक उत्पन्न योजनेमध्ये १५ लाख रुपये जमा केले, तर ७.४% व्याजानुसार तुम्हाला दर महिन्याला सुमारे ९,२५० रुपये निश्चित व्याज मिळेल. जर तुम्ही सिंगल अकाउंटमध्ये ९ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला दर महिन्याला सुमारे ५,५५० रुपयांचे निश्चित व्याज मिळेल. आणि १० लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला दर महिन्याला सुमारे ६,१६७ रुपयांचे फिक्स व्याज मिळेल.
योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षांची असते. ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर (मॅच्युरिटीनंतर) तुमची गुंतवलेली मूळ रक्कम आणि उर्वरित व्याज तुमच्या खात्यात परत जमा होते. मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जात असल्यामुळे, यात गुंतवलेले पैसे अत्यंत सुरक्षित राहतात आणि निश्चित उत्पन्न मिळते.
जे लोक बाजारातील जोखीम टाळून स्थिर आणि नियमित मासिक उत्पन्नाचा स्रोत शोधत आहेत, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना एक उत्तम आणि विश्वसनीय पर्याय आहे.
