Retirement Fund : तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहायचे असेल, तर नॅशनल पेन्शन सिस्टम अर्थात एनपीएस हा एक अत्यंत विश्वासार्ह आणि सरकार समर्थित गुंतवणूक पर्याय आहे. देशाचे नागरिक आणि अनिवासी भारतीय या दोघांसाठी खुली असलेली ही योजना मार्केट-लिंक्ड असून, दीर्घकाळात स्थिर परतावा देण्यासाठी ओळखली जाते.
गुंतवणूकदार त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार इक्विटी, कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक निवडू शकतात, हे एनपीएसचे मोठे वैशिष्ट्य आहे. कर सवलत, चक्रवाढ व्याजाचा फायदा आणि गुंतवणुकीतील लवचीकता यामुळे एनपीएस रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी सर्वोत्तम साधन ठरते.
गुंतवणूक करणे अतिशय सोपे
- एनपीएस खाते उघडणे खूप सोपे आहे आणि तुम्ही फक्त १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. ही सुविधा बँक, पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन फंड कार्यालयात उपलब्ध आहे. १८ ते ७० वर्षांपर्यंतचा कोणताही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकतो.
- टिअर १ यातील रक्कम निवृत्तीपर्यंत सुरक्षित राहते (काही अटींसह अंशतः काढता येते). तर टिअर २ मधील रक्कम तुम्ही कधीही काढू शकता.
- गुंतवणूकदार 'ॲक्टिव्ह चॉईस' अंतर्गत स्वतः फंड निवडू शकतात किंवा 'ऑटो चॉईस'द्वारे सिस्टीमला वयानुसार गुंतवणूक निश्चित करू देऊ शकतात.
१०,००० मासिक गुंतवणुकीतून तयार होईल 'कोट्यवधींचा फंड'
समजा तुमचे वय सध्या २५ वर्षे आहे. आणि तुम्ही एनपीएस योजनेत १०,००० रुपये मासिक गुंतवणूक सुरू केली. ही रक्कम दरवर्षी ५% इतकी वाढवली. जवळपास ३५ वर्षे या योजनेत तुम्ही गुंतवणूक सुरू ठेवली. या गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा १२.११% वार्षिक (ॲक्टिव्ह चॉईस अंतर्गत अंदाजे). असा गृहीत धरला.
या हिशोबाने, ३५ वर्षांनंतर तुमची एकूण जमा रक्कम सुमारे १.०८ कोटी असेल. परंतु, १२.११% वार्षिक परताव्यामुळे हा फंड वाढून तब्बल ८.८४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो!
निवृत्तीनंतर दरमहा २ लाख रुपये पेन्शन
निवृत्तीनंतर यापैकी ६०% रक्कम, म्हणजेच सुमारे ५.३ कोटी रुपये तुम्ही एकाच वेळी काढू शकता.
उर्वरित ४०% रक्कम, म्हणजेच ३.५३ कोटी रुपये ॲन्युटी प्लॅनमध्ये गुंतवली जाईल.
या ॲन्युटीवर अंदाजित परतावा मिळाल्यास, तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा सुमारे २ लाख रुपयांची पेन्शन मिळू शकते, जी तुमच्या स्थिर उत्पन्नाचा एक मजबूत आधार बनेल.
वाचा - 'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
एनपीएस ही केवळ एक सुरक्षित गुंतवणूक नाही, तर ती आर्थिक स्वातंत्र्य आणि मानसिक शांततेचे आश्वासन देणारी योजना आहे. जर तुम्ही वेळेवर गुंतवणूक सुरू केली, तर भविष्यात पैशांची कोणतीही चिंता राहणार नाही.
