KVP Scheme: आजच्या काळात जेव्हा शेअर बाजारात सतत चढ-उतार सुरू असतात आणि अनेक लोक आपल्या गुंतवणुकीबाबत संभ्रमात असतात, अशा वेळी प्रत्येक गुंतवणूकदार सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायाच्या शोधात असतो. जर तुम्हालाही तुमची कष्टाची कमाई पूर्णपणे सुरक्षित ठेवून ठराविक काळात दुप्पट करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (KVP) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना गुंतवणुकीवर १०० टक्के सरकारी हमी देते.
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय
किसान विकास पत्र ही एक फिक्स्ड इन्कम सेव्हिंग स्कीम आहे, जी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाते. या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवलेली रक्कम एका ठराविक कालावधीनंतर आपोआप दुप्पट होते. म्हणूनच, ज्यांना जोखमीपासून दूर राहून गॅरंटीड परतावा हवा असतो, अशा लोकांमध्ये ही योजना विशेष लोकप्रिय आहे.
शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
७.५% वार्षिक व्याज आणि परतावा
सध्या किसान विकास पत्रावर ७.५ टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज दिलं जात आहे. या व्याजदरानुसार, गुंतवलेली रक्कम ११५ महिने म्हणजेच सुमारे ९ वर्षे ७ महिन्यांत दुप्पट होते. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदारानं किसान विकास पत्रामध्ये १ लाख रुपये गुंतवले, तर मुदत पूर्ण झाल्यावर त्याला २ लाख रुपये मिळतील. विशेष म्हणजे, लहान गुंतवणूकदार देखील या योजनेत सहजपणे गुंतवणूक सुरू करू शकतात.
किसान विकास पत्रामध्ये किमान १,००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते, तर कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. गुंतवणूकदार आपल्या इच्छेनुसार सिंगल अकाऊंट किंवा जॉइंट अकाऊंटच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावानंदेखील केव्हीपी खातं उघडू शकतात, ज्यामुळे भविष्यातील गरजांसाठी सुरक्षित निधी तयार करता येतो.
योजनेचे इतर फायदे आणि अटी
या योजनेचे अनेक अतिरिक्त फायदे आहेत. केव्हीपीवर १०० टक्के सरकारी हमी मिळत असल्यानं गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. गरज भासल्यास केव्हीपी प्रमाणपत्राच्या आधारे बँकेकडून कर्जही घेता येतं. याशिवाय, हे खातं एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करण्याची आणि नॉमिनी नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
कर आकारणी आणि पैसे काढण्याची सुविधा
किसान विकास पत्र ही जरी दीर्घकालीन योजना असली, तरी अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही अटींसह यातून अंशतः किंवा पूर्ण पैसे काढता येतात. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की, केव्हीपीवर मिळणारं व्याज करपात्र असतं, म्हणजेच त्यावर आयकराचे नियम लागू होतात.
