Digital Gold : गेल्या काही वर्षांत मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून १ रुपयांत सोने खरेदी करण्याची 'डिजिटल गोल्ड' ही पद्धत प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मात्र, या झगमगाटामागे मोठी जोखीम लपलेली आहे. खुद्द 'सेबी'नेगुंतवणूकदारांना डिजिटल गोल्डपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याने आता या क्षेत्रातील गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
'सेबी' आणि 'आरबीआय'चे नियंत्रण नाही!
डिजिटल गोल्डची सर्वात मोठी त्रुटी म्हणजे हे उत्पादन कोणत्याही सरकारी संस्थेद्वारे 'रेग्युलेट' किंवा नियंत्रित केले जात नाही. सेबी डिजिटल गोल्डला 'सिक्युरिटी' किंवा 'कमोडिटी डेरिव्हेटिव्ह' मानत नाही. त्यामुळे ज्या अॅपवरून तुम्ही सोने खरेदी केले आहे, ते अॅप किंवा कंपनी डिफॉल्ट झाली, तर 'सेबी' तुम्हाला कोणतेही संरक्षण देऊ शकणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील याला बँकिंग किंवा डिपॉझिट उत्पादन मानत नाही. थोडक्यात सांगायचे तर, ही पूर्ण गुंतवणूक केवळ त्या अॅप किंवा प्लॅटफॉर्मच्या विश्वासावर अवलंबून आहे.
बाजाराची व्याप्ती आणि इतिहास
भारतात २०१२ मध्ये 'ऑगमॉन्ट' कंपनीने पहिल्यांदा डिजिटल गोल्डची सुरुवात केली. त्यानंतर 'MMTC-PAMP' या सरकारी आणि स्विस कंपनीच्या संयुक्त उपक्रमाने यात प्रवेश केला. पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या अॅप्सनी या कंपन्यांशी भागीदारी केल्यामुळे २०१२ मध्ये ५,००० कोटींचा असलेला हा बाजार आता १३,८०० कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
गुंतवणुकीपूर्वी 'या' धोक्यांचा विचार करा
- प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता : अनेक प्लॅटफॉर्म केवळ मध्यस्थ म्हणून काम करतात. त्यांच्याकडे स्वतःचा सोन्याचा साठा नसतो. अशा वेळी कंपनीचा सर्व्हर बंद पडला किंवा तांत्रिक वाद निर्माण झाला, तर तुमची गुंतवणूक अडकू शकते.
- फिजिकल गोल्डची डिलिव्हरी : डिजिटल गोल्ड खरेदी करताना कंपन्या तिसऱ्या पक्षाच्या व्हॉल्टमध्ये सोने ठेवल्याचा दावा करतात. मात्र, हे सोने प्रत्यक्ष पाहणे किंवा त्याची डिलिव्हरी घेणे अनेकदा खर्चिक आणि क्लिष्ट असते.
- किंमतीतील तफावत : डिजिटल गोल्ड खरेदी आणि विक्री करताना सोन्याच्या दरात मोठी तफावत असते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना तात्काळ नफा मिळवणे कठीण जाते.
वाचा - सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
सुरक्षित गुंतवणूक कशी करावी?
जर तुम्हाला सोन्यातच गुंतवणूक करायची असेल, तर तज्ज्ञांनी खालील सुरक्षित पर्याय सुचवले आहेत.
- सोव्हरेन गोल्ड बाँड : हे आरबीआयतर्फे जारी केले जातात आणि यावर वार्षिक २.५% व्याजही मिळते.
- गोल्ड ईटीएफ : हे शेअर बाजारात 'सेबी'च्या देखरेखीखाली चालतात.
