Gold And Silver ETF News: मार्च महिन्यात गोल्ड ETF मधील गुंतवणुकीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीनुसार, गोल्ड इनफ्लो ५७% नं कमी होऊन २,२६५ कोटी रुपयांवर आला आहे, जो फेब्रुवारीमध्ये ५,२५४ कोटी रुपये होता. दुसरीकडे, सिल्व्हर ETF मधून गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या महिन्यात पैसे काढून घेतलेत. मार्चमध्ये सिल्व्हर ETF मधून ६८३ कोटी रुपयांचा आउटफ्लो झाला, तर फेब्रुवारीमध्ये ८२६ कोटी रुपये काढण्यात आले.
कमोडिटी बेस्ड ETF ची सुमार कामगिरी
मार्च महिन्यात कमोडिटी बेस्ड ETF ची कामगिरी अत्यंत कमकुवत राहिली. या काळात अनेक ETF मध्ये १५% पर्यंत घसरण झाली असून, त्यात सिल्व्हर ETF मध्ये सर्वाधिक घट दिसून आली. एकूण ४३ कमोडिटी ETF पैकी सर्वांनीच या महिन्यात नकारात्मक परतावा दिला. UTI Silver ETF मध्ये सर्वाधिक १४.७२% घसरण झाली. त्यापाठोपाठ DSP Silver ETF मध्ये १३.९६%, Aditya Birla SL Silver ETF मध्ये १३.८५%, Zerodha Silver ETF मध्ये १३.८१% आणि HDFC Silver मध्ये १३.८१% घट झाली. उर्वरित १३ सिल्व्हर ETF मध्येही मार्च दरम्यान ११% ते १३.८०% पर्यंत घसरण नोंदवण्यात आली.
महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
गोल्ड ETF वर देखील दबाव
मार्च महिन्यात २५ गोल्ड ETF मध्येही घसरण नोंदवली गेली. या ETF चा परतावा ७.१७% ते ९.५४% दरम्यान नकारात्मक राहिला, ज्यामुळे सोन्याशी संबंधित फंडांवर दबाव असल्याचं स्पष्ट झालंय.
तज्ज्ञांचं मत
मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सीनियर ॲनलिस्ट नेहल मेश्राम यांच्या मते, मार्च २०२६ मध्ये गोल्ड ETF मध्ये निव्वळ इनफ्लो सुरूच राहिला, परंतु गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत त्याचा वेग मंदावला. गुंतवणुकीचा वेग कमी झाला असला तरी, सोने आधारित गुंतवणूक उत्पादनांमध्ये गुंतवणूकदारांचा रस अजूनही कायम आहे. वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या वेगवान वाढीनंतर स्थिती सामान्य होणं आणि नवीन गुंतवणुकीत झालेली काहीशी घट ही मार्चमधील मंदावलेल्या वेगाची कारणं असू शकतात, असं मेश्राम यांनी सांगितलं.
गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
टाटा म्युच्युअल फंडाच्या अहवालानुसार, बाजारातील संमिश्र परिस्थिती, अमेरिकेतील व्याजदरांमधील दीर्घकाळची स्थिरता, मजबूत डॉलर आणि जास्त परतावा यांमुळे सोन्याच्या किमती अल्प कालावधीत सध्याच्या मर्यादेत राहण्याची शक्यता आहे. या काळात किमतींमध्ये सुमारे ५% पर्यंत चढ-उतार होऊ शकतो. परंतु, मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी सोन्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहतो. अहवालात असंही सुचवलंय की, किमती घसरल्यावर गुंतवणूकदार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करू शकतात. चांदीच्या बाबतीत, तिच्या अस्थिर स्वरूपामुळे, एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी मध्यम ते दीर्घ कालावधीत टप्प्याटप्प्यानं गुंतवणूक करणे अधिक चांगलं राहील, असा सल्ला दिला आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
