Forex Reserve : गेल्या काही काळापासून परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सध्या देशाचा परकीय चलन साठा ऐतिहासिक उच्चांकावर आहे. आपला देश परकीय चलन साठ्याच्या बाबतीत जगातील बहुतांश देशांपेक्षा खूप चांगल्या स्थितीत असून, सध्या सर्वाधिक परकीय चलन साठा असलेल्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
लोकसभेत देशाच्या परकीय चलन साठ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, सप्टेंबर महिन्यात आपल्या देशाच्या परकीय चलन साठ्याने 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा 704 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेला. US $ 700 अब्ज पेक्षा जास्त परकीय चलन साठा असणारा चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर भारत हा चौथा देश बनला आहे.
सोन्याचा साठाही वाढला
रिझर्व्ह बँकेकडे सध्या 854.73 मेट्रिक टन सोने असल्याचेही लोकसभेत सांगण्यात आले आहे. यापैकी 510.46 मेट्रिक टन सोने भारताच्या बँकांमध्ये ठेवण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या आकडेवारीनुसार भारताच्या मालकीच्या सोन्याचे एकूण मूल्य 65.75 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.