Gold Owned by Indian Households Morgan Stanley Report: सोन्याच्या किंमतीमध्ये झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे भारतीय कुटुंबांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य 3.8 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. हे देशाच्या जीडीपीच्या अर्थात एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या जवळपास ८८.८ टक्के इतके आहे. मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध झाला आहे. त्यात याबद्दलची आकडेवारी मांडण्यात आली आहे.
मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात म्हटले आहे की, सोन्याच्या मालकीमधून मिळणारा संपत्तीचे मूल्य अधिक वाढले आहे. कमी झालेल्या व्याज देयकांमुळे आणि अलीकडच्या काळात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कपातीमुळे वाढलेल्या खर्च करण्यायोग्य उत्पन्नामुळे हे घडले आहे.
सरकारने अलीकडेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतीयांचा उपभोग वाढून आणि खरेदी वाढावी यासाठी जीएसटी दरात कपात केली आहे आणि आयकर कपात लागू केली आहे.
वर्षभरात सोन्याच्या दरात ५४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ
या वर्षात सोन्याच्या किमती ५४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या असून, १० ग्रॅम सोन्याचा दर १.२७ लाख रुपये या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.
या दरवाढीचा परिणाम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणांवरही झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०२४ पासून आपल्या गंगाजळीत सुमारे ७५ टन सोन्याची भर घातली आहे. यामुळे आरबीआयकडील एकूण सोन्याचा साठा ८८० टनांवर पोहोचला आहे. हे प्रमाण भारताच्या परकीय चलन साठ्याच्या सुमारे १४ टक्के इतके आहे.
घरगुती बचतीचे पर्याय बदलले
भारतीयांचे घरगुती आर्थिक बचत करण्याचे पर्यायही बदलले आहेत. घरगुती बचतीत शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा वाटा आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १५.१ टक्के इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८.७ टक्के आणि कोरोनापूर्वी फक्त ४ टक्के इतकाच होता.
बचतीमध्ये बँकेतील ठेवींचा वाटा मागील वर्षाच्या ४० टक्के आणि कोरोनापूर्वी ४६ टक्के इतका होता. तो घसरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
मॉर्गन स्टॅनलीच्या रिपोर्टनुसार, अनुकूल लोकसंख्याशास्त्र आणि वाढती गुंतवणूक साक्षरता यामुळे घरगुती गुंतवणुकीमध्ये शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा वाटा वाढत राहण्याचा अंदाज आहे.
सोन्याच्या किंमती वाढतच जाणार
गेल्या काही वर्षात विशेषतः कोविडनंतर सोन्याचे भाव वेगाने वाढले आहेत. सोन्याच्या दरात अनियंत्रित तेजी आलेली असून, ती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. देशांतर्गत बाजारात सोन्याचा प्रति १० ग्रॅमसाठी १.२६ लाख रुपयांच्या पुढे पोहोचला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस ४,००० डॉलर पर्यंत पोहोचला आहे.
या वर्षात सोन्याच्या दरात ५४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. व्याजदर कपातीची अपेक्षा, डॉलरचे कमकुवत होणे, मध्यवर्ती बँकांची जोरदार सोने खरेदी आणि सुरू असलेले भू-राजकीय (युद्धजन्य परिस्थिती) तणाव ही या भाव वाढीला कारणीभूत ठरली आहेत.
सोन्याची २०२५ मधील ही वाढ ऐतिहासिक आहे. ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, २००८ च्या आर्थिक संकटानंतर किंवा कोरोना महामारीच्या काळातील वाढीलाही या वाढीने मागे टाकले आहे.