Property Tips : शहरात आलेल्या प्रत्येकाला आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. यासाठी पदरमोड करुन लोक आयुष्यभर पै-पै साठवतात. मात्र, काही गोष्टी माहिती नसल्याने अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष करुन जे लोक पहिल्यांदा घर खरेदी करणार आहेत, त्यांनी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी. तुम्हीही पहिल्यांदाच घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत.
घराची किंमत
घरातील गुंतवणूक ही कायमस्वरुपी मानली जाते. त्यामुळे तुमचे पैसे हुशारीने गुंतवा. जर तुम्हाला महागडे घरच घ्यायचं असेल तर ठीक आहे. जर कमी बजेट असेल तर त्याच बजेटमध्ये घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे निर्णय घेतला तर तो अंगलट येऊ शकतो.
गृहकर्ज कशी तयारी कराल?
जर गृहकर्ज काढून घर खरेदी करण्याचं डोक्यात असेल तर काही गोष्टींची आधीपासून तयारी करायली हवी. सर्वात आधी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असायला हवा. तर बँका तुम्हाला प्रॉपर्टीच्या किमतीच्या ९० टक्के कर्ज देऊ शकतात. पण, कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी जास्तीत जास्त डाउन पेमेंट भरल्यास उत्तम. म्हणजे तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागणार नाही. गृहकर्ज घेण्यापूर्वी, वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्था यांच्या कर्जाची तुलना करा. तुम्हाला सर्वात स्वस्त कर्ज कुठे मिळेल? तिथेच अर्ज करा.
पगाराचा अंदाज घ्या
तुम्ही जर नोकरदार असाल तर तुमच्या पगारातून कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत, हे लक्षात असुद्या. आगामी काळात तुमची पगारवाढ लक्षात घेऊन कर्जाचा हप्ता घ्या. यासोबतच हेही लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या पगारात घराचा संपूर्ण खर्च उचलावा लागेल.
खर्चाचं गणित
गृहकर्ज घेण्यापूर्वी, तुमच्या खर्चाचा हिशेब तयार करा आणि खर्च कुठे कमी करता येईल किंवा थांबवता येईल यावर लगेच काम करा. अनावश्यक खर्चापासून शक्य तितके अंतर ठेवा. जेणेकरून भविष्यात ईएमआय भरण्यात कधीही अडचण येणार नाही.