SIP vs EMI : जर तुमची मासिक बचत वाढली तर तुम्ही तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगल्या प्रकारे मजबूत करू शकता. तुमचे उत्पन्न वाढल्याने तुमची बचत वाढेल. तुमच्या हातात जास्त पैसे राहतील. पण, उत्पन्न वाढल्यानंतर येणारे पैसे एसआयपीमध्ये गुंतवायचे की गृहकर्जाची ईएमआय वाढवायची, जेणेकरून कर्जातून लवकर मुक्त होता येईल. तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.
मुदतपूर्व कर्जाची परतफेड
मुदतपूर्व कर्ज फेडल्यास दीर्घकालीन कर्जाशी संबंधित आर्थिक ताणतणावातून मुक्ती मिळू शकते. तसेच कर्ज लवकर संपल्यामुळे व्याजात मोठी बचत होते. आता याचे तोटे पण पाहू. गृहकर्ज लवकर बंद केल्यास आयकर सवलतीचा लाभ थांबतो. गुंतवणुकीतून संभाव्य उच्च परताव्याच्या संधी हुकतील. भविष्यातील आर्थिक आणीबाणी किंवा उद्दिष्टांसाठी निधी जमा करण्यात पैसे उरणार नाहीत.
एसआयपीमध्ये पैसे गुंतववणे
आपत्कालीन किंवा इतर आर्थिक गरजांसाठी पुरेसा निधी जमा करता येतो. प्रीपेमेंटद्वारे वाचवलेल्या व्याजापेक्षा चक्रवाढ व्याजातून खूप जास्त परतावा मिळू शकतो. इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणुकीतील वैविध्य महागाईशी लढण्यासाठी मदत करेल. आता याची दुसरी बाजू देखील विचारात घेऊ. शेअर मार्केटमधील परतावा हा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. त्यामुळे या योजनेतील पैसे जोखमीच्या अधीन असतात. बाजारातील चढउतारांदरम्यान तुमच्या गुंतवणूक योजनेला चिकटून राहण्यासाठी संयम आणि शिस्त आवश्यक आहे. म्हणून दोन्ही पर्यायांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.
समतोल राखणे महत्त्वाचे
कर्जाला शत्रू समजू नये. कर्जाची परतफेड आणि संपत्ती निर्मिती यामध्ये समतोल राखणे महत्त्वाचे आहे. तरलता, परतावा आणि जोखीम यांचे आकलन करून आर्थिक नियोजन केले पाहिजे. मनःशांती आणि दीर्घकालीन समृद्धी या दोन्हीची खात्री देणारा मार्ग तुम्ही निवडू शकता. आर्थिक आव्हानांना वाढीच्या संधींमध्ये बदलण्यासाठी शिस्त आणि चक्रवाढ शक्तीचा वापर करा.