investment strategies : श्रीमंत लोकांची संपत्ती वेगाने का वाढत आहे? असा प्रश्न तुमच्याही मनात कधीतरी आलाच असेल. याचं उत्तर आता एका अहवालातून समोर आलं आहे. दोन लाख कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या देशातील बड्या गुंतवणूकदारांच्या मुलाखतींनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आपल्या पोर्टफोलिओमधील ७० टक्क्यांहून अधिक हिस्सा हे गुंतवणूकदार आता इक्विटी, खाजगी मार्केट आणि पर्यायी गुंतवणुकीसारख्या 'हाय-ग्रोथ' मालमत्तांमध्ये गुंतवत आहेत.
गुंतवणुकीचा नवा 'ट्रेंड' : थेट शेअर बाजाराला पसंती
अहवालानुसार, ६७ टक्के अतिश्रीमंत गुंतवणूकदारांनी त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी १० टक्क्यांहून अधिक वाटा थेट शेअर बाजारात गुंतवला आहे. विशेष म्हणजे, पारंपारिक आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक या गटात कमी होताना दिसत आहे. साधारण ४४ टक्के गुंतवणूकदारांनी वर्षाला १३ ते १५ टक्के इतक्या भरघोस परताव्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
तरुण वारसदार अधिक आक्रमक
गुंतवणुकीच्या बाबतीत सर्वात मोठी क्रांती तरुण पिढीमध्ये पाहायला मिळत आहे. अतिश्रीमंत कुटुंबांतील ९५ टक्के तरुण वारसदार त्यांच्या पोर्टफोलिओमधील ५० ते ९० टक्के हिस्सा अत्यंत आक्रमक पद्धतीने 'ग्रोथ ॲसेट्स'मध्ये गुंतवत आहेत. संपत्ती केवळ टिकवून ठेवण्यापेक्षा ती गुणाकाराच्या पटीत वाढवण्याकडे या तरुणांचा ओढा अधिक आहे.
केवळ नफाच नाही, सामाजिक कार्यावरही भर
अतिश्रीमंत लोक केवळ स्वतःच्या संपत्तीचा विचार करत नसून, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मोठे योगदान देत आहेत. अहवालानुसार, ६७ टक्के श्रीमंत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे कार्य करत आहेत, तर ४९ टक्के श्रीमंतांनी शिक्षण क्षेत्रातील सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली आहे.
अतिश्रीमंत कुठे आणि कशी गुंतवणूक करतात?
- हाय-ग्रोथ मालमत्ता (७०% पेक्षा जास्त गुंतवणूक) : ६८% गुंतवणूकदार.
- वार्षिक १३-१५% परताव्याची अपेक्षा : ४४% गुंतवणूकदार.
- थेट शेअर बाजारात (१०% पेक्षा जास्त गुंतवणूक) : ६७% गुंतवणूकदार.
- सामाजिक कार्य (आरोग्य क्षेत्र) : ६७% श्रीमंत.
- सामाजिक कार्य (शिक्षण क्षेत्र) : ४९% श्रीमंत.
वाचा - शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
