Home Loan Tips : स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचं असतं. मात्र, अनेक लोकांना गृह कर्जावरील प्रचंड व्याजदरामुळे आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. कर्ज कितीही लहान असले तरी त्याचा दीर्घ कालावधीतील व्याज मुद्दलापेक्षा जास्त होते. पण, आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या एका सोप्या युक्तीचा वापर करून तुम्ही तुमचे गृह कर्ज प्रभावीपणे व्याजमुक्त करू शकता. तुम्हाला कर्जावर जेवढे व्याज द्यावे लागेल, त्यापेक्षा जास्त परतावा तुम्ही एका छोट्या गुंतवणुकीतून मिळवू शकता.
गृह कर्ज व्याजमुक्त करण्याची 'SIP' ट्रिक काय?
गृह कर्ज सहसा १५ ते ३० वर्षांच्या मोठ्या कालावधीसाठी घेतले जाते. या ट्रिक्समध्ये तुम्हाला तुमच्या गृह कर्जाच्या मंजुरीनंतर लगेचच एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करायचा आहे.
सोपे नियम: तुमचा गृह कर्जाचा कालावधी जर ३० वर्षांचा असेल, तर तुम्ही एसआयपीची मुदतही ३० वर्षे ठेवा.
SIP ची रक्कम: कर्जाच्या व्याजावर मात करण्यासाठी तुम्हाला दरमहा केवळ १,५०० ते २,००० रुपयांची एक छोटी एसआयपी म्युच्युअल फंडात सुरू करायची आहे. चक्रवाढ व्याजाच्या मदतीने ही लहान गुंतवणूक मोठा निधी उभा करते.
उदाहरणार्थ: गृह कर्जाचे गणित
हे गणित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गृह कर्जाच्या आधारावर समजून घेऊ
तपशील | रक्कम |
गृह कर्जाची मूळ रक्कम | ३० लाख |
कर्जाचा कालावधी | ३० वर्षे |
अंदाजित व्याजदर | ७.५०% (वार्षिक) |
बँकेला दिलेली एकूण रक्कम | ७५,५१,५१७ लाख रुपये |
३० वर्षांत भरलेले एकूण व्याज | ४५,५१,५१७ लाख रुपये |
SIP चा पॉवर आणि मोठा परतावा
आता तुम्ही कर्जाच्या पहिल्या महिन्यापासून दरमहा फक्त १,७०० रुपयांची एसआयपी सुरू केली (आणि बाजारातून साधारणपणे १२% वार्षिक परतावा गृहीत धरल्यास)
तपशील | रक्कम |
दरमहा SIP | १,७०० रुपये |
SIP कालावधी | ३० वर्षे |
३० वर्षांत जमा केलेली एकूण गुंतवणूक | ६,१२,००० रुपये |
३० वर्षांत मिळालेला व्याज/परतावा | ४६,२५,६५४ रुपये |
नंतर जमा होणारा एकूण निधी (कॉर्पस) | ५२,३७,६५४ रुपये |
तुम्ही गृह कर्जावर भरलेले एकूण व्याज (४५,५१,५१७ रुपये) या एसआयपीमधून मिळालेल्या परताव्यापेक्षा (४६,२५,६५४ रुपये) कमी आहे.
वाचा - ४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
याचा अर्थ, एसआयपीने कमावलेला अतिरिक्त नफा तुमच्या गृह कर्जाचा संपूर्ण व्याज खर्च सहजपणे भरून काढतो, ज्यामुळे तुमचे गृह कर्ज प्रभावीपणे व्याजमुक्त ठरते! हा निधी तुम्ही कर्जाच्या शेवटी भरलेला व्याज किंवा कर्जाची मोठी रक्कम कमी करण्यासाठी वापरू शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)