Small Saving Schemes : मुलांच्या जन्मानंतर आईवडिलांची चिंता वाढते. शिक्षण ते लग्न अशा मोठ्या खर्चासाठी पैसे जमवावे लागतात. तुम्हीही अशाच चिंतेत असाल तर काळजी करू नका. सरकारने लहान बचत योजनांच्या माध्यमातून नागरिकांना चांगला परतावा मिळवण्याची संधी दिली आहे. याच योजनांपैकी एक अत्यंत लोकप्रिय आणि सुरक्षित योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. विशेषतः मुलींच्या भविष्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
जर तुमच्या घरी १० वर्षांखालील मुलगी असेल, तर तुम्ही या योजनेत दरवर्षी थोडी थोडी गुंतवणूक करून लाखो रुपयांचा मोठा निधी जमा करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना काय आहे?
१० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी तिचे पालक किंवा कायदेशीर पालक या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतात.
मुलीचे उच्च शिक्षण आणि तिच्या लग्नासाठी मोठा निधी जमा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत वर्षाला २५० रुपये भरणे अनिवार्य आहे. तर वर्षाला १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या या योजनेवर ८.२% दराने वार्षिक व्याज मिळते. खाते उघडल्यापासून १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवावी लागते. योजनेची परिपक्वता २१ वर्षांची असते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावरच खात्यातून निधी काढता येतो.
५,००० रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर किती मिळेल परतावा?
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने या योजनेत नियमित गुंतवणूक केली, तर मोठा परतावा मिळू शकतो.
तपशील | रक्कम |
मासिक गुंतवणूक | ₹५,००० |
वार्षिक गुंतवणूक | ₹६०,००० |
एकूण गुंतवणुकीचा कालावधी | १५ वर्षे |
१५ वर्षांत केलेली एकूण गुंतवणूक | ₹९,००,००० (₹६०,००० x १५) |
मिळालेले एकूण व्याज (८.२% दराने) | ₹१८,७१,०३१ |
२१ वर्षांनंतर मिळणारा एकूण फंड | ₹२७,७१,०३१ |
या उदाहरणावरून स्पष्ट होते की, केवळ ₹९ लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही सुमारे ₹१८.७१ लाख निव्वळ नफा मिळवू शकता आणि ₹२७ लाखांहून अधिकचा मोठा फंड जमा करू शकता.
गुंतवणूक कशी सुरू करावी?
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत जाऊन अर्ज करू शकता. यासाठी सामान्यतः मुलीचा जन्म दाखला आणि पालकांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा यांसारखी कागदपत्रे लागतात.