Gold-Silver Rate Today: जागतिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठा चढ-उतार सुरू आहे. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन ते १,६४,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलंय. दुसरीकडे, चांदीच्या बाबतीत संमिश्र कल दिसून येत असून, हाजिर बाजारात घसरण तर वायदा बाजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबुती पाहायला मिळत आहे.
दिल्लीत सोनं चमकलं, चांदीची चकाकी कमी
राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी झेप घेतली आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी १,६२,९०० रुपये असलेल्या सोन्याचा दर वाढून १,६४,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याच्या उलट, दिल्लीत चांदीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. स्टॉकिस्ट आणि ज्वेलर्सकडून मागणी कमी झाल्यामुळे चांदी २,५०० रुपयांनी स्वस्त होऊन २,६८,००० रुपये प्रति किलोवर आली आहे. मात्र, विविध प्लॅटफॉर्मवर दरांमध्ये फरक असून 'गुडरिटर्न्स'नुसार चांदीचा भाव २,८५,००० रुपयांपर्यंत दिसला, तर IBJA नुसार शुक्रवारी सायंकाळपर्यंत हा दर २,६६,७०० रुपये प्रति किलो होता.
वेतन प्रणालीत ५ मोठे बदल: ५०% बेसिक पे आवश्यक, ६० वर्षे जुना नियम रद्द होणार
MCX आणि वायदा बाजाराची स्थिती
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीच्या वायदा भावात मोठी हालचाल सुरू आहे. २ एप्रिल २०२६ च्या सोन्याच्या करारात १३३ रुपयांची किरकोळ घसरण होऊन तो १,६१,९७१ रुपयांवर बंद झाला. दरम्यान, चांदीच्या मार्च डिलिव्हरीच्या करारात व्यवहारादरम्यान ३% पेक्षा जास्त तेजी दिसून आली, ज्यामुळे दर २,६७,९०० रुपयांपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे, याचवर्षी २९ जानेवारी रोजी चांदीनं ४,२०,०४८ रुपये प्रति किलोचा आपला ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही मजबुती असून हाजिर चांदी वाढून ८९.७२ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.
बाजारात अस्थिरता का?
बाजार तज्ज्ञांच्या मते, या चढ-उतारामागे अनेक जागतिक कारणे आहेत. वाढता भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेच्या व्यापारी धोरणांबाबतची अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सोन्या-चांदीला सुरक्षित गुंतवणूक मानून खरेदी करत आहेत. तसंच, सोलर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातून चांदीला असलेल्या मोठ्या औद्योगिक मागणीनेही किमतींना आधार दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात अमेरिकेचा आर्थिक डेटा आणि इराण-अमेरिका यांच्यातील तणाव बाजाराची पुढील दिशा ठरवेल, ज्यामुळे अल्पकाळात ही अस्थिरता कायम राहू शकते.
