Gold-Silver Price Fall: गुरुवारी भारतीय वायदा बाजारात (MCX) सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. MCX वर सोनं १,४९,६५० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झालं, तर चांदी ४.४८% च्या मोठ्या घसरणीसह २,३२,६०० रुपये प्रति किलोच्या पातळीवर स्थिरावली. आज म्हणजेच शनिवारी MCX वरील व्यवहार बंद असले, तरी जागतिक बाजारातील (Global Market) संकेत मात्र चिंताजनक आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात (COMEX) चांदी २.९०८ डॉलर्सनं घसरून -३.८२% च्या घसरणीसह ७३.१७० डॉलर्स प्रति औंस वर आली आहे. त्याच वेळी, सोनंदेखील ११०.४० डॉलर्सच्या (-२.२९%) मोठ्या घसरणीनंतर ४,७०२.७० डॉलर्स प्रति औंस वर व्यवहार करत आहे.
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
किमतीतील घसरणीची मुख्य कारणं
जागतिक स्तरावर डॉलर इंडेक्समधील मजबूती आणि बॉन्ड यील्डमधील वाढीमुळे मौल्यवान धातूंवर दबाव वाढला आहे. मध्यवर्ती बँकांचा व्याजदरांबाबतचा कडक दृष्टिकोन आणि भू-राजकीय तणावात किरकोळ घट होण्याचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीऐवजी इतर पर्यायांकडे वळले आहेत. याशिवाय, तांत्रिक सुधारणांमुळे उच्च स्तरावर नफावसुली हावी राहिली, ज्यामुळे कॉमेक्स आणि देशांतर्गत बाजार या दोन्ही ठिकाणी विक्रीचा ओघ पाहायला मिळाला.
बाजारची स्थिती आणि गुंतवणूकदार
बाजाराची सध्याची स्थिती पाहता मोठे गुंतवणूकदार सध्या सोने-चांदीसारख्या कमोडिटीपासून अंतर राखत आहेत. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकदार सध्या वेट अँड वॉच असं धोरण अवलंबत आहेत, ज्यामुळे किमतींमध्ये सातत्यानं घसरण दिसून येत आहे.
खरेदीसाठी उत्तम संधी?
किमतींमधील ही घसरण सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून, या काळात दागिन्यांची मोठी मागणी असते. भारतीय कुटुंबांसाठी किमती काहीही असल्या तरी सोने खरेदीला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. अशा परिस्थितीत, कमोडिटी मार्केटमधील ही मोठी घसरण अशा लोकांसाठी खरेदीची उत्तम संधी ठरू शकते जे दीर्घकाळापासून भाव कमी होण्याची वाट पाहत होते.
