Gold Reserve : आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. द कोबेसी लेटरच्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिन्यात सुमारे १९ टन सोन्याची खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे, सलग २३ महिन्यांपासून ही खरेदी सुरू आहे. ही खरेदी सोन्यावरील वाढत्या विश्वासाचे द्योतक मानले जात आहे.
वर्षाच्या सुरुवातीपासूनच जोरदार खरेदी
जानेवारी महिन्यात ६ टन सोन्याची खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण केंद्रीय बँकांच्या राखीव साठ्यात २५ टन सोन्याची वाढ झाली आहे. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोने सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिले जात असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.
कोणता देश आघाडीवर?
फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या खरेदीत नॅशनल बँक ऑफ पोलंड अव्वल ठरली. पोलंडने सुमारे २० टन सोने खरेदी करून आपला एकूण साठा ५७० टनांवर नेला आहे. हा देशाच्या एकूण विदेशी चलन साठ्याच्या सुमारे ३१ टक्के आहे. तसेच, उझबेकिस्तानच्या केंद्रीय बँकेनेही आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ केली आहे. त्यांनी सुमारे ८ टन सोने खरेदी करून एकूण साठा ४०७7 टनांवर नेला आहे, जो त्यांच्या विदेशी चलन साठ्याच्या तब्बल ८८ टक्के आहे.
काही देशांकडून सोन्याची विक्री
एकीकडे अनेक देश सोन्याची खरेदी करत असताना, काही देशांनी आपल्या साठ्यात घट केली आहे. फेब्रुवारीमध्ये तुर्की आणि रशिया यांनी अनुक्रमे ८ टन आणि ६ टन सोन्याची विक्री केली. तर, मार्च महिन्यात तुर्कीनेदेखील परकीय चलनाची गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला. मध्यपूर्वेतील तणाव आणि चलन स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
सर्वाधिक गोल्ड रिजर्व असलेले देश
अमेरिका - ८,१३३ टन
जर्मनी - ३,३५० टन
इटली - २,४५३ टन
फ्रान्स - ३,४३७ टन
रशिया - २,३३० टन
चीन - २,२९९ टन
स्वित्झर्लंड - १,०४० टन
भारत - ८८० टन
जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, महागाईचा दबाव आणि भू-राजकीय तणाव यामुळे केंद्रीय बँका सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. आगामी काळातही सोन्याच्या खरेदीचा हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
