Gold Rate : सध्या सोन्याचे वाढणारे दर पाहून सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरत आहे. सोन्याने गुंतवणुकीच्या बाबतीत शेअर बाजार परताव्यालाही मागे टाकलं आहे. तुम्हीही सध्याच्या स्थितीत सोने खरेदी किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. १ लाख १३ हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेले सोने आज किंचित घसरले. परंतु, त्याची एकूण तेजी कायम आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,१३,५८० प्रति १० ग्रॅमवर पोहोचला, जो कालच्या ₹१,१४,०४४ च्या तुलनेत किंचित कमी आहे. पण, सोन्याच्या किमतीचा हा फुगा लवकर फुटेल असा इशारा एका संस्थेने दिला आहे.
जीएसटी कपातीचा 'फायदा' नाही!
जीएसटी स्लॅबमध्ये २२ सप्टेंबरपासून मोठे बदल लागू झाले असले तरी, सोन्या-चांदीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. सरकारने सोने आणि चांदीला जीएसटी कपातीच्या यादीतून बाहेर ठेवले आहे. याचा अर्थ, पूर्वीप्रमाणेच सोन्यावर आजही ३% जीएसटी आणि मेकिंग चार्जवर (घडणावळ शुल्क) ५% जीएसटी वेगळा लागू होत राहील. त्यामुळे, स्वस्त सोन्याची अपेक्षा करणाऱ्यांची निराशा झाली आहे.
सोने दराच्या तेजीची कारणे आणि बुडबुड्याचा इशारा
सोने ज्या वेगाने वाढत आहे, त्यावरून जाणकारांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने १.५ लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा आकडा पार करेल, अशी शक्यता वर्तवली आहे. सोन्याच्या या तेजीला खालील घटक बळ देत आहेत.
- जागतिक तणाव: भू-राजकीय समस्यांमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत.
- कमजोर डॉलर: अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याची मागणी वाढली आहे.
- मध्यवर्ती बँकांची खरेदी: जगभरातील मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी सुरू केली आहे.
- यामुळेच, यावर्षी सोन्याने ४०% पर्यंत आणि गेल्या ६ वर्षांत ३ पटीने वाढ नोंदवली आहे.
सोन्याचा 'फुगा' फुंटणार? तज्ञांची दुहेरी मतं
सोन्याच्या या अभूतपूर्व तेजीवरबुडबुडा फुटण्याची भीती अनेक दिग्गज व्यक्त करत आहेत.
धोक्याची घंटा: दिग्गज ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनी थेट इशारा दिला आहे की, सोने, क्रिप्टो आणि शेअर बाजार यांसारख्या अनेक मालमत्ता सध्या मोठ्या बबलचा भाग असू शकतात. एकाएकी होणारी ही वेगवान वाढ मोठी हानी पोहोचवू शकते, असे मत आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे एस नरेन यांनीही व्यक्त केले आहे.
उलट मत: मात्र, दुसरीकडे जेफरीज या ब्रोकरेज फर्मचे मत आहे की, सोन्याचा दर २ लाख रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
वाचा - सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
या दुहेरी मतांमुळे, सोन्यातील व्यापक कल सकारात्मक असला तरी, गुंतवणूकदारांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
आजचे (२५ सप्टेंबर) सोन्याचे दर
- २४ कॅरेट (शुद्ध सोने) १,१३,५८० रुपये
- २२ कॅरेट (दागिने) १,०४,०४० रुपये
- १८ कॅरेट ८५,१९० रुपये