Shrare Market Future : सोने आणि शेअर बाजार यांचं विळा आणि भोपळ्याचं नातं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, एक पडला की दुसरा वर जातो. गेल्या ५ महिन्यांपासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. तर दुसरीकडे सोन्याचे भाव नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. शेअर बाजार उच्चांकी पातळीवरुन ७३००० रुपयांपर्यंत घसरला आहे, तर सोन्याने ८९००० रुपये प्रति १० ग्रॅमची विक्रमी पातळी गाठली. बाजाराच्या घसरणीत दिग्गज कंपन्यांचे शेअर्स ३० ते ४० टक्क्यांच्या तोट्यासह व्यवहार करताना दिसतात. अशा परिस्थितीत भविष्यात सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल की बाजारात पुन्हा तेजी येईल? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येत आहे. चला जाणून घेऊ.
येत्या काही वर्षात सर्वाधिक परतावा कोण देईल?
पुढील ३ वर्षांत शेअर बाजार सोन्यापेक्षा जास्त नफा देईल, असा अंदाज एडलवाईस म्युच्युअल फंडाने अलीकडील अहवालात दिला आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. पण आर्थिक वाढीसह शेअर बाजार वाढण्याची अपेक्षा आहे, असे या अहवालात म्हटले आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजार हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो.
शेअर बाजार सोन्यापेक्षा जास्त नफा देईल?
अहवालात सेन्सेक्स आणि सोन्याच्या गुणोत्तरावर लक्ष केंद्रित केले आहे. यावरून येत्या काही वर्षांत शेअर बाजार सोन्यापेक्षा जास्त नफा देऊ शकतो हे दिसून येते. गेल्या २५ वर्षांत सोन्याने दरवर्षी सरासरी १२.५५% नफा दिला आहे, तर सेन्सेक्सने १०.७३% नफा दिला आहे. तरीही सध्याची आर्थिक स्थिती शेअर बाजारासाठी चांगली असल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय, गेल्या १० वर्षांत, सोन्याने शेअर बाजारापेक्षा केवळ ३६% वेळा जास्त नफा दिला आहे. यावरून असे दिसून येते की अल्पकालीन चढउतार असूनही, शेअर बाजाराने साधारणपणे दीर्घकाळात उच्च नफा दिला आहे.
वर्षभरात सोन्यात १४ टक्क्यांची वाढ
या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे १४ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. या तेजीच्या ट्रेंडमध्ये चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली. एमसीएक्सवर चांदीने शुक्रवारी १,०१,९९९ रुपये प्रति किलोचा नवा विक्रम गाठला. तर मार्च महिन्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २,६०० रुपयांनी वाढला आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीतही आतापर्यंतची सर्वोच्च वाढ नोंदवली गेली आहे.
सोने की इक्विटी, कोण जास्त भारी?
सोने आणि शेअर बाजार हे फार पूर्वीपासून ऐकमेकांच्या विरोधात गुंतवणुकीचे पर्याय मानले जात आहेत. आर्थिक संकटाच्या काळात सोने त्याच्या स्थिरतेसाठी ओळखले जाते, तर शेअर बाजाराने ऐतिहासिकदृष्ट्या आर्थिक रिकव्हरीदरम्यान चांगला परतावा दिला आहे. ज्या लोकांना पुढील काही वर्षांमध्ये त्यांचा परतावा वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी शेअर बाजार हा अधिक फायदेशीर गुंतवणूक पर्याय असू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)