Gold Silver Price Hike : जागतिक भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंनी आज पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दराने प्रथमच ४,५०० डॉलर्स प्रति औंस (साधारण २८.३४ ग्रॅम) ही ऐतिहासिक पातळी ओलांडली आहे. भारतीय बाजारपेठेचा विचार करता, सोन्याचे दर आता १,४२,५०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या घरात पोहोचले असून, चांदीनेही सव्वा दोन लाख रुपयांचा टप्पा ओलांडून नवा उच्चांक गाठला आहे.
'ट्रम्प' यांची भूमिका अन् अमेरिकन तणावाचा फटका
सोन्याच्या किमतीत आलेल्या या प्रचंड उधाणामागे प्रामुख्याने अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता तणाव कारणीभूत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेल टँकर्सची नाकाबंदी करण्याचे संकेत दिल्याने आणि कॅरिबियन क्षेत्रात लष्करी हालचाली वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराट आहे. अशा अस्थिर वातावरणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून जागतिक स्तरावर सोन्याला मोठी मागणी मिळत आहे. तसेच, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षी व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याने सोन्याच्या तेजीला अधिक बळ मिळाले आहे.
एमसीएक्स वर विक्रमी व्यवहार : चांदीतील 'तेजी' कायम
५ फेब्रुवारी २०२६ च्या एक्सपायरी असलेल्या सोन्याच्या दरात ५३२ रुपयांची वाढ होऊन ते १,३८,४१७ रुपयांवर ट्रेड करत होते. सत्रादरम्यान या दराने १,३८,६७६ रुपयांचा उच्चांक गाठला. तर चांदीने आज गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ३,११० रुपयांनी वधारून २,२२,७६३ रुपयांवर पोहोचला. सत्रात चांदीने २,२४,३०० रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
१९७९ नंतरची सर्वात मोठी वार्षिक तेजी
चालू वर्ष सोन्या-चांदीसाठी 'विक्रमी' ठरले आहे. या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ७० टक्क्यांहून अधिक, तर चांदीच्या किमतीत तब्बल १५० टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. १९७९ नंतरची ही या धातूंनी केलेली सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. केंद्रीय बँकांनी केलेली सोन्याची खरेदी आणि गोल्ड ईटीएफ मधील वाढती गुंतवणूक हे यामागील प्रमुख कारण आहे. 'वर्ल्ड गोल्ड काउंसिल'नुसार, मे महिना वगळता यंदा प्रत्येक महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे.
वाचा - स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
पुढे काय? गोल्डमॅन सॅक्सचा अंदाज
जगप्रसिद्ध गुंतवणूक बँक 'गोल्डमॅन सॅक्स'च्या मते, सोन्याची ही घोडदौड २०२६ पर्यंत सुरूच राहू शकते. त्यांच्या अंदाजानुसार, सोन्याचा दर ४,९०० डॉलर्स प्रति औंसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केवळ सोने-चांदीच नव्हे, तर प्लॅटिनमनेही २,३०० डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून १९८७ नंतरची ही उच्चांकी पातळी आहे.
