Gold Silver Price Today : सध्या गुंतवणूकदारांची स्थिती 'कभी खुशी, कभी गम' अशी झाली आहे. कारण, त्यांच्याकडे असलेल्या सोने-चांदीचा भाव आता वाढला आहे. मात्र, नवीन खरेदी करताना मात्र अधिक पैसे मोजावे लागतील. सणासुदीच्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. मंगळवारी २४ कॅरेट सोन्याने तब्बल १३०० रुपयांची मोठी झेप घेत, १,१०,२९० रुपये प्रति १० ग्रॅम असा विक्रमी उच्चांक गाठला आहे. भूराजकीय अनिश्चितता आणि अमेरिकेतील नोकरीच्या कमकुवत आकडेवारीमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे आकर्षित झाले आहेत, ज्यामुळे सोन्याची चमक आणखी वाढली आहे.
जागतिक बाजारातही अमेरिकेतील नोकरीच्या आकडेवारीतील निराशा आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता यामुळे सोन्याला मागणी वाढली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ३६५५.८३ डॉलर प्रति औंस दराने व्यवहार करत आहे, ज्यात ०.५४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
तुमच्या शहरातील सोन्याचे ताजे भाव
आज राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,१०,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,०१,२५० रुपये आहे. त्याचप्रमाणे, आर्थिक राजधानी मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळूरु आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने १,१०,२९० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,०१,१०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.
याशिवाय, जयपूर, अहमदाबाद आणि पाटणा येथे २४ कॅरेट सोन्याचा दर १,१०,३४० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,०१,१५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
भारतात सोन्याचे दर कसे ठरतात?
सोन्याचे आणि चांदीचे दर दररोज अनेक कारणांवरून निश्चित होतात. भारतातील सोन्याचा दर ठरवण्यामध्ये आंतरराष्ट्रीय दरांव्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टींचा प्रभाव असतो. यामध्ये, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय दर, आयात शुल्क, जीएसटी आणि इतर स्थानिक करांचा समावेश असतो.
सोन्याच्या दरात मल्टी कमोडिटी एक्सचेंजची भूमिका महत्त्वाची असते. हे भारतातील एक प्रमुख कमोडिटी एक्सचेंज आहे, जिथे सोन्या-चांदीचे फ्युचर्स ट्रेडिंग होते. या ट्रेडिंगमधूनच देशातील सोन्याचा दर निश्चित होतो. त्यामुळे, जागतिक बाजारातील किमतींचा आणि डॉलर-रुपयाच्या दरातील बदलांचा थेट परिणाम येथील दरांवर होतो.
वाचा - तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
शिवाय, जेव्हा युद्ध किंवा आर्थिक मंदीसारखी जागतिक अनिश्चितता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजार किंवा इतर अस्थिर गुंतवणुकीऐवजी सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायाला प्राधान्य देतात. भारतात सोने केवळ गुंतवणूकच नाही, तर परंपरा आणि सांस्कृतिक मान्यतेचाही भाग आहे, त्यामुळे सण आणि शुभप्रसंगी सोन्याची मागणी वाढते, ज्यामुळे किमती प्रभावित होतात.