Elon Musk Wealth: जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक इलॉन मस्क यांनी संपत्तीच्या बाबतीत नवा इतिहास रचला आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मस्क यांची एकूण संपत्ती 750 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली असून, सध्या ती 754.3 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. एवढी संपत्ती मिळवणारे ते जगातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.
मुकेश अंबानींपेक्षा 7 पट जास्त संपत्ती
इलॉन मस्क यांची नेटवर्थ ही आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपेक्षा सुमारे 7 पट अधिक आहे. अंबानी यांची एकूण संपत्ती सुमारे 114 अब्ज डॉलर आहे. तर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती लॅरी पेज यांची नेटवर्थ 254.7 अब्ज डॉलर असून, ती मस्क यांच्या संपत्तीपेक्षा तब्बल 500 अब्ज डॉलर्सने कमी आहे.
एका दिवसात 5.4 अब्ज डॉलर्सची वाढ
सोमवारी मस्क यांच्या संपत्तीत पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवण्यात आली. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात त्यांच्या नेटवर्थमध्ये 5.4 अब्ज डॉलर्सची भर पडली. सध्याच्या वर्षात मस्क यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली असून, इतर कोणताही अब्जाधीश त्यांच्या आसपासही दिसत नाही.
आयर्लंडच्या जीडीपीपेक्षाही मोठी संपत्ती
विशेष म्हणजे, मस्क यांची संपत्ती आता देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू लागली आहे. युरोपातील महत्त्वाच्या देशांपैकी एक असलेल्या आयर्लंडची जीडीपी 750.11 अब्ज डॉलर आहे, तर मस्क यांची नेटवर्थ 754.3 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. ही वाढ अशीच सुरू राहिल्यास, लवकरच बेल्जियम आणि तैवान यांच्याही जीडीपीला मस्क यांची संपत्ती मागे टाकू शकते. जर मस्क यांची नेटवर्थ 1 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेली, तर स्वित्झर्लंडची जीडीपी देखील मागे पडण्याची शक्यता आहे.
भारताच्या बजेटपेक्षा जास्त
सध्याच्या घडीला मस्क यांची संपत्ती भारताच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षाही जास्त आहे. आर्थिक वर्ष 2026 साठी भारताचा वार्षिक अर्थसंकल्प सुमारे 50.65 लाख कोटी रुपये आहे, तर एलन मस्क यांची नेटवर्थ 67 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. आर्थिक वर्ष 2027 मध्ये अर्थसंकल्पात 10 ते 15 टक्के वाढ झाली, तरीही तो 60 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीतही मस्क यांची संपत्ती भारताच्या बजेटपेक्षा जास्तच राहील.
ट्रिलिनियर होण्याच्या दिशेने
इलॉन मस्क सध्या 1 ट्रिलियन डॉलर्सच्या नेटवर्थपासून अवघ्या 250 अब्ज डॉलर अंतरावर आहेत. ज्या वेगाने त्यांची संपत्ती वाढत आहे, त्यावरून ते लवकरच जगातील पहिले ‘ट्रिलिनियर’ (1 ट्रिलियन डॉलरची संपत्ती असणारे) व्यक्ती ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
किती कंपन्यांचे मालक आहेत मस्क?
इलॉन मस्क हे सात कंपन्यांचे सह-संस्थापक आहेत. त्यामध्ये...
टेस्ला (इलेक्ट्रिक कार कंपनी)
स्पेसएक्स (रॉकेट आणि अवकाश तंत्रज्ञान)
xAI (कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप)
यांचा समावेश आहे.
मस्क यांच्याकडे टेस्लामधील सुमारे 12 टक्के हिस्सा आहे. 2008 पासून ते कंपनीचे सीईओ आहेत. 2002 मध्ये स्थापन झालेल्या स्पेसएक्सचे मूल्य डिसेंबर 2025 मधील खासगी टेंडर ऑफरनुसार 800 अब्ज डॉलर्स इतके आहे. मस्क यांचा यात अंदाजे 42 टक्के हिस्सा आहे. तर, 2022 मध्ये मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्सला ट्विटर (आता ‘X’) विकत घेतले.
मार्च 2025 मध्ये ट्विटरचे xAI सोबत विलीनीकरण करण्यात आले असून, कर्जासह एकत्रित कंपनीचे मूल्य सुमारे 125 अब्ज डॉलर्स आहे. याशिवाय त्यांनी द बोरिंग कंपनी (टनलिंग स्टार्टअप) आणि न्यूरालिंक (ब्रेन इम्प्लांट कंपनी) यांचीही स्थापना केली आहे. या दोन्ही स्टार्टअप्सने मिळून आतापर्यंत सुमारे 2 अब्ज डॉलर्सचे खासगी भांडवल उभारले आहे.
