Ramayana:रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला. टीझरमध्ये भगवान रामाच्या भूमिकेतील रणबीर आणि रावणाची भूमिकेतील यशची पहिली झलक पाहायला मिळाली. टीझर इतका जबरदस्त आहे की, चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाचे बजेट ८३५ अन् दुसऱ्या भागाचे बजेट ७०० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शशन नितेश तिवारी करत असून, नमित मल्होत्रा निर्मिती करत आहेत. नितेश तिवारी यांच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती मल्होत्राच्या प्राइम फोकस स्टुडिओने केली आहे. दरम्यान, 'रामायण'बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग पुढील वर्षी रिलीज होणार आहे, मात्र आताच या चित्रपटाने १००० कोटींची कमाई केली आहे.
'रामायण'चे निर्माते मालामाल
'रामायण'चे टीझर समोर येताच नमित मल्होत्राच्या प्राइम फोकस स्टुडिओला त्याचा प्रचंड फायदा झाला अन् चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच स्टुडिओचे नशीब शेअर बाजारात चमकले. खरं तर, या चित्रपटाच्या टीझरमुळे, प्राइम फोकस स्टुडिओचे मार्केट कॅप प्रचंड वाढले आहे. प्राइम फोकस बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर सूचीबद्ध आहे. कंपनीच्या बोर्डाने ४६२.७ मिलियन इक्विटी शेअर्स जारी करण्यास मान्यता दिल्यानंतर कंपनीला मोठा नफा झाला आहे.
'रामायण'ने रिलीजपूर्वी १००० कोटींची कमाई केली.
यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३०% वाढ झाली असून, २५ जून ते १ जुलै दरम्यान शेअरची किंमत ११३.४७ रुपयांवरून १४९.६९ रुपये झाली. पण, त्यानंतर रामायणाच्या पहिल्या लूकने नमित मल्होत्राच्या प्राइम फोकस स्टुडिओने आणखी एक मोठा नफा नोंदवला. ३ जुलै रोजी रामायणची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर, शेअर्समध्ये आणखी वाढ झाली. ३ जुलैपर्यंत कंपनीचे शेअर्स १७६ रुपयांवर पोहोचले. यासह, कंपनीचे बाजार भांडवल ४,६३८ कोटी रुपयांवरून ५,६४१ कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले. म्हणजेच, फक्त दोन दिवसांत १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली.
रणबीर कपूरची प्राइम फोकसमध्ये गुंतवणूक
रामायणमध्ये रामाची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरदेखील चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये गुंतवणूकदार बनणार आहे. कंपनीच्या बोर्डाने नवीन शेअर्स जारी करण्यास मान्यता दिल्यानंतर, रणबीर प्रस्तावित वाटपांमध्ये होता. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, रणबीर कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करेल. रणबीर हे शेअर्स किती किमतीला खरेदी करेल हे माहित नसले तरी, त्यांच्या सध्याच्या बाजारभावानुसार त्याची गुंतवणूक सुमारे ₹२० कोटी आहे.
रामायण कधी रिलीज होणार?
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा दोन भागांचा चित्रपट असेल, ज्याचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीला आणि दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसेल.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)