Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओला इलेक्ट्रिकला 'शॉक'! एकेकाळी नंबर वन, आता 'टीव्हीएस-बजाज'ने टाकले मागे, 'या' कारणांनी घसरण

ओला इलेक्ट्रिकला 'शॉक'! एकेकाळी नंबर वन, आता 'टीव्हीएस-बजाज'ने टाकले मागे, 'या' कारणांनी घसरण

Ola Electric : ओला इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मे महिन्यात कंपनीच्या विक्रीत जवळपास ६०% घट झाली, ज्यामुळे तिचा बाजारातील वाटा फक्त २०% पर्यंत कमी झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:26 IST2025-05-28T11:12:56+5:302025-05-28T11:26:46+5:30

Ola Electric : ओला इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मे महिन्यात कंपनीच्या विक्रीत जवळपास ६०% घट झाली, ज्यामुळे तिचा बाजारातील वाटा फक्त २०% पर्यंत कमी झाला.

Ola Electric Slips to Third Spot TVS & Bajaj Lead India's E-Scooter Market | ओला इलेक्ट्रिकला 'शॉक'! एकेकाळी नंबर वन, आता 'टीव्हीएस-बजाज'ने टाकले मागे, 'या' कारणांनी घसरण

ओला इलेक्ट्रिकला 'शॉक'! एकेकाळी नंबर वन, आता 'टीव्हीएस-बजाज'ने टाकले मागे, 'या' कारणांनी घसरण

Ola Electric : इलेक्ट्रिक स्कूटरच्या जगात दबदबा असणाऱ्या ओला इलेक्ट्रिक कंपनीला सध्या उतरती कळा लागली आहे. नुकत्याच समोर आलेल्या अहवालातून ओलाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. एकेकाळी मार्केट लीडर असलेली ओला आता या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मे महिन्यात, टीव्हीएस मोटर आणि बजाज ऑटोने ओलाला मागे टाकत बाजारातील आपली पकड मजबूत केली आहे.

ओलाची घसरण, जुन्या कंपन्यांची भरारी
मे महिन्याच्या पहिल्या २६ दिवसांत ओला इलेक्ट्रिकचा बाजार हिस्सा २०% पर्यंत घसरला आहे, जो एप्रिलमध्ये २२.१% होता. या काळात ओलाने फक्त १५,२२१ इलेक्ट्रिक स्कूटरची नोंदणी केली. गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील ३७,३८८ नोंदणीच्या तुलनेत ही जवळजवळ ६०% ची मोठी घट आहे. ओला सध्या अनेक ऑपरेशनल आणि नियामक आव्हानांना (Regulatory Challenges) तोंड देत आहे, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.

याउलट, पारंपारिक वाहन कंपन्यांनी मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. टीव्हीएस मोटर २५% बाजार हिस्सा घेऊन आता अव्वल स्थानावर आहे, तर बजाज ऑटो २२.६% हिस्सा घेऊन दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. त्यांच्या नोंदणी संख्येत थोडी घट झाली असली तरी, त्यांचा बाजारातील वाटा वाढला आहे. एथर एनर्जीचा (Ather Energy) हिस्साही १३.१% पर्यंत कमी झाला आहे, जो एप्रिलमध्ये १४.९% होता. एकंदरीत, इलेक्ट्रिक स्कूटर क्षेत्रात आता जुन्या आणि स्थापित कंपन्यांचे वर्चस्व वाढत असल्याचे चित्र आहे, तर नवीन स्टार्टअप्ससाठी काळ आव्हानात्मक ठरत आहे.

सीईओ भाविश अग्रवाल यांच्या लक्ष्यापासून खूप मागे
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी यापूर्वी म्हटले होते की, जर कंपनीने दरमहा ५०,००० वाहने विकली, तर त्यांचा ऑटो व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. पण आता कंपनी या लक्ष्यापेक्षा खूपच मागे आहे. ओलाविरुद्ध विक्रीच्या आकडेवारीतील अनियमितता, काही दुकानांमध्ये आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि वाहनांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी अशा अनेक प्रकारच्या चौकशी सुरू आहेत.

फेब्रुवारीमध्ये कंपनीने २५,००० वाहने विकल्याचा दावा केला होता, पण सरकारी नोंदींमध्ये फक्त ८,६५२ नोंदणी झाल्याचे दिसून आले. यामुळे सरकारी यंत्रणांनी तपास सुरू केला. याशिवाय, ओला आपल्या 'ओला' ब्रँडची मालकी एका नवीन कंपनीकडे हस्तांतरित करत आहे, जी सीईओच्या कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आहे. यामुळे काही जुने गुंतवणूकदार नाराज आहेत.

आर्थिक स्थिती कमकुवत, तरीही नव्या उत्पादनांवर भर
ओलाने स्वतःचे बॅटरी सेल तयार करण्यासाठी एक मोठा कारखाना बांधण्याची योजना आखली होती, यासाठी १,२०० कोटी रुपये राखून ठेवले होते. परंतु, आतापर्यंत एकही पैसा खर्च झालेला नाही. कंपनीची आर्थिक परिस्थितीही कमकुवत होत चालली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान, कंपनीला ५६४ कोटी रुपयां तोटा सहन करावा लागला आणि तिच्या उत्पन्नातही सुमारे १९% घट झाली.

वाचा - शेअर बाजारात उतरताच १०० रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर मात्र घसरण

या सर्व आव्हानांमध्येही, ओला आपली नवीन उत्पादने बाजारात आणत आहे, जसे की इलेक्ट्रिक मोटरसायकल 'रोडस्टर एक्स' (Roadster X) आणि नवीन पिढीच्या स्कूटर (Next-gen Scooters). ग्राहकांना पुन्हा आकर्षित करणे हा त्यांचा उद्देश आहे. बाजारातील स्पर्धा तीव्र असून, येत्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक स्कूटर क्षेत्रातील परिस्थिती आणखी मनोरंजक होऊ शकते.

Web Title: Ola Electric Slips to Third Spot TVS & Bajaj Lead India's E-Scooter Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.