No salary hike for Mukesh Ambani for 11th year in a row | ११ वर्षांपूर्वीइतकंच 'पॅकेज' आजही घेताहेत मुकेश अंबानी; यंदाही स्वतःचं 'अप्रेझल' नाही!
११ वर्षांपूर्वीइतकंच 'पॅकेज' आजही घेताहेत मुकेश अंबानी; यंदाही स्वतःचं 'अप्रेझल' नाही!

ठळक मुद्देरिलायन्स वेगवेगळ्या क्षेत्रात कशा उंचच उंच भराऱ्या घेत आहे, हे आपण बघतोच आहोत. परंतु, गेल्या ११ वर्षात मुकेश अंबानी यांनी स्वतःच्या पगारात अजिबात वाढ केलेली नाही. २००८-०९ या आर्थिक वर्षात त्यांचं जे पॅकेज होतं, तेच आजही कायम आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. अलीकडेच ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनं प्रसिद्ध केलेल्या जगभरातील धनाढ्यांच्या यादीतही ते १३व्या क्रमांकावर आहेत. रिलायन्स वेगवेगळ्या क्षेत्रात कशा उंचच उंच भराऱ्या घेत आहे, हे आपण बघतोच आहोत. स्वाभाविकच, कंपनीची उलाढालही दरवर्षी वाढते आहे. परंतु, गेल्या ११ वर्षात मुकेश अंबानी यांनी स्वतःच्या पगारात अजिबात वाढ केलेली नाही. २००८-०९ या आर्थिक वर्षात त्यांचं जे पॅकेज होतं, तेच आजही कायम आहे. 

रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी ऑक्टोबर २००९ मध्ये मुकेश अंबानी यांनी आपलं वार्षिक वेतन स्थिर ठेवण्यासंबंधी घोषणा केली होती. त्यावेळी वेतन, भत्ते, कमिशन हे सगळं मिळून त्यांचं वार्षिक पॅकेज १५ कोटी रुपये होतं. आजही ते कायम आहे. अन्य संचालकांच्या पॅकेजमध्ये घसघशीत वाढ होत असतानाही, मुकेश अंबानी यांनी स्वतःचं वेतन कायम ठेवलं आहे. त्यामुळे काही संचालकांचं पॅकेज त्यांच्यापेक्षाही जास्त झालं आहे. 

मुकेश अंबानी यांना वेतन आणि भत्ते मिळून २०१८-१९ या वर्षात ४.४५ कोटी रुपये मिळाले. आधीच्या वर्षी ही रक्कम ४.४९ कोटी इतकी होती. त्याशिवाय, कमिशनच्या रूपात त्यांना ९.५३ कोटी रुपये मिळाले. अंबानी यांच्यापेक्षा अधिक पॅकेज निखील आणि हितल मेसवानी यांना आहे. २०१७-१८ मध्ये दोघांनाही १९.९९ कोटी रुपये मिळाले होते, ते आता २०.५७ कोटी झाले आहे. कार्यकारी संचालक पी एम एस प्रसाद यांचं पॅकेज ८.९९ कोटी होतं, ते आता १०.०१ कोटी आहे.    

अर्थात, रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वाधिक शेअर्स अंबानींकडे असल्यानं डिव्हिडंटमधून येणारी रक्कम खूपच मोठी आहे. 

Web Title: No salary hike for Mukesh Ambani for 11th year in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.