Zomato boy Success Story: ही कहाणी आहे २३ वर्षांच्या नंदन रेणुकप्पा याची. त्यानं पारंपारिक व्यवसायाच्या सीमा ओलांडून एका अनोख्या उद्योगाची सुरुवात केली आहे. बंगळुरुच्या सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बी.कॉमचे विद्यार्थी असलेल्या नंदन यानं त्याच्या प्री-युनिव्हर्सिटीच्या काळात कॉलेजसाठी कस्टम जॅकेट बनवून फॅशनचं जग समजून घेतले. अनेक सुरुवातीच्या अपयशातून शिकल्यानंतर त्यांना भारतीय बाजारपेठेत एक मोठी गॅप दिसली. ती म्हणजे जागतिक दर्जाच्या ट्रेंडी स्ट्रीटवेअरची कमतरता.
ही कमतरता दूर करण्यासाठी त्यानं सप्टेंबर २०२२ मध्ये 'अनटेम्ड स्ट्रीटवेअर' हा ब्रँड लॉन्च केला. हा ब्रँड आइसक्रीम कार्ट पासून प्रेरित होता. फक्त वीकेंडमध्ये विक्री करणारं हे अनोखे 'डायरेक्ट-टू-कस्टमर' मॉडेल 'जनरेशन झेड' (Gen Z) आणि 'मिलेनियल्स' (Millennials) यांना टार्गेट करतं. नंदननं झोमॅटो डिलिव्हरी बॉयसारखी कामं करून १ लाख रुपयांची सुरुवातीची रक्कम जमा केली. या उद्योगानं अवघ्या एका वर्षात ४० लाख रुपयांच्या वार्षिक उलाढालीपर्यंत मजल मारली. आज त्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
२३ वर्षांच्या नंदन रेणुकप्पा यानं सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बीकॉमला प्रवेश घेण्यापूर्वीच फॅशनच्या जगात पाऊल ठेवलं होतं. तेव्हा तो प्री-युनिव्हर्सिटीमध्ये असताना म्हणजेच प्रवेश घेण्यापूर्वीच कॉलेजसाठी मोठ्या प्रमाणात कस्टम जॅकेट आणि हुडीज बनवत होता. २०२१ मध्ये सुरू झालेल्या या प्रवासानं त्याला फॅशनचं मूलभूत ज्ञान दिलं. त्यांच्या सुरुवातीच्या अपयशातून (एक फूड व्यवसाय आणि एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी) शिकल्यानंतर नंदन यांनी स्ट्रीटवेअर क्षेत्रात प्रवेश केला. येथे त्याला एक मोठी पोकळी आढळली. भारतीय बाजारात एकतर लक्झरी ब्रँड्स होते किंवा अगदी साधे कपडे. पण, जागतिक दर्जाचे आरामदायक आणि ट्रेंडी फॅशन उपलब्ध नव्हते. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यानं सप्टेंबर २०२२ मध्ये आपला ब्रँड 'अनटेम्ड स्ट्रीटवेअर' लॉन्च केला. या ब्रँडनं केवळ विकेंडला एका कार्टद्वारे बंगळूरुच्या चर्च स्ट्रीट आणि इंदिरा नगर येथे विक्री सुरू केली. अवघ्या एका वर्षात त्यांनी ४० लाख रुपयांची वार्षिक उलाढाल गाठली.
शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स २९० तर, निफ्टी ९३ अंकांनी आपटला, 'या' शेअर्सनं केलं नुकसान
अशी सुचली कल्पना
नंदन यांना चर्च स्ट्रीटवर एक आइसक्रीम कार्ट पाहून स्ट्रीटवेअर कार्ट सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यांचा ब्रँड स्ट्रीटवेअरला केवळ 'कॅज्युअल वेअर' नाही, तर संस्कृती, ओळख आणि कला म्हणून पाहतो. हा ब्रँड 'जेन झेड' आणि 'मिलेनियल्स'ना टार्गेट करतो. हे लोक फक्त कपडे नव्हे, तर 'एक अनुभव' देखील शोधत असतात. हा उद्योग त्यांच्या डिझाइन आणि उत्पादनाचे बहुतेक काम इन-हाऊस स्टुडिओमध्ये करतो. कार्टद्वारे थेट ग्राहकांना विक्री करतो. सध्या त्यांच्याकडे टी-शर्ट, हुडीज, कार्गो आणि ॲक्सेसरीजच्या जवळपास ४० डिझाइन्स आहेत. नंदन याला त्याच्या आईचा मोठा पाठिंबाही आहे.
सुरुवातीला अडचणींचा सामना
नंदन याच्यासाठी स्ट्रीटवेअर ही काही अचानक आलेली स्टार्टअप आयडिया नव्हती. तो त्याच्या अनेक प्रयोग आणि अपयशांचा परिणाम होता. फूड बिझनेस आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पैसे गमावल्यानंतर पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फॅशन ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या अडचणींमुळे त्यांना पहिल्या वर्षाचं कॉलेज सोडावं लागले. ब्रँड योग्य प्रकारे लॉन्च करण्यासाठी त्यांना पैसे वाचवावे लागले. त्यांनी झोमॅटोवर फूड डिलिव्हरी करण्याचं आणि चर्च स्ट्रीटवर स्टिकर/पोस्टर विकण्यासारखी छोटी कामे केली, जेणेकरून १ लाख रुपयांची सुरुवातीची रक्कम जमा करता येईल. ही फंडिंग कोणत्याही बाह्य गुंतवणुकीशिवाय पूर्णपणे स्वतःच्या बचतीतून होती. जेव्हा त्यानं या बचतीतून स्ट्रीटवेअर कार्ट लॉन्च केला, तेव्हा लोकांचा प्रतिसाद जबरदस्त होता. यामुळे वीकेंडची विक्रीच ३-४ लाख रुपयांपर्यंत पोहोचली.
भविष्यातील योजना स्पष्ट आहेत
बाजारात तीव्र स्पर्धा असूनही, नंदन यांच्या सहा सदस्यांच्या टीम असलेल्या ब्रँडच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. शॉर्ट टर्म टार्गेट म्हणून त्यांना लवकरच आपला कार्ट एका ट्रकमध्ये अपग्रेड करायचा आहे. पॅन-इंडियासाठी ऑनलाइन विक्रीवर भर देण्याचा त्याचा विचार आहे. मीडियम टर्म टार्गेट या उद्योगाला 'स्ट्रीटवेअर ब्रँड ऑफ इंडिया' बनवणं आहे. तर, त्याचं लाँग टर्म टार्गेट ब्रँडला जागतिक स्तरावर नेणं, कोलॅबरेशन करणं आणि एक लाइफस्टाइल एक्सपीरियन्स देणं आहे.