Nikhil Kamath Elon Musk Podcast: आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या युगात जगत आहोत. एका कमांडवर हजारो कामं सेकंदांमध्ये पूर्ण होताहेत. आपण याला एआयच्या जगाची सुरुवातीची पायरी म्हणू शकतो, पण भविष्यात काय होणार आहे, याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता आणि ऑफिसला जाण्याची कोणतीही चिंता नाही. बॉसचीही भीती नाही, महिन्याच्या शेवटी बिल भरण्याचीही काळजी नाही... हे ऐकायला एखाद्या सुंदर स्वप्नासारखे वाटतं, नाही का? पण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांचे मत आहे की, हे स्वप्न खूप लवकर वास्तव बनणार आहे.
अलीकडेच मस्क यांनी भारतीय शेअर ब्रोकिंग कंपनी 'झिरोधा'चे (Zerodha) सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत विशेष संवाद साधला. निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये मस्क यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि रोबोटिक्सच्या भविष्याबद्दल जे सांगितलं, त्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय.
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
पुढील २० वर्षांत जग कसं असेल?
निखिल कामत यांच्याशी बोलताना मस्क यांनी एक खूप मोठी भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले की, ज्या वेगाने एआय आणि रोबोट्स अधिक हुशार होत आहेत, ते पाहता असं वाटतं की, पुढील १० ते २० वर्षांत लोकांसाठी काम करणं 'गरज' किंवा सक्तीचं राहणार नाही. "माझा अंदाज आहे की भविष्यात काम करणं पूर्णपणे पर्यायी असेल." त्यांचा असा विश्वास आहे की पुढील दीड ते दोन दशकांत, तंत्रज्ञान अशा टप्प्यावर पोहोचेल जिथे आज आपल्याला आवश्यक असलेली जवळजवळ प्रत्येक गोष्ट मशीन करू शकतील.
काम फक्त एक 'छंद' बनून राहील
आपलं मत स्पष्ट करण्यासाठी मस्क यांनी एक खूपच चांगलं उदाहरण दिले. ते म्हणाले की, भविष्यात नोकरी करणे हे असं असेल, जसं आज छंदासाठी घरात भाजीपाला पिकवण्यासारखं आहे. "आज तुम्ही बाजारातून भाजीपाला खरेदी करू शकता, पण तरीही काही लोक त्यांच्या घरातील बागेत भाजीपाला पिकवतात. ते हे नाईलाजानं करत नाहीत, तर त्यांना त्यात आनंद मिळतो म्हणून करतात," असंही ते म्हणाले. मस्क यांच्या मते, भविष्यात लोक काम करतील, पण त्यांना घर चालवायचं आहे म्हणून नाही, तर त्यांची इच्छा असेल म्हणून करतील. काम हा एक 'छंद' बनून राहील.
हे खरोखरच शक्य आहे का?
मस्क यांनी हे देखील सांगितले की, आजच्या काळात लोक या भविष्यवाणीला चुकीचं मानू शकतात आणि कदाचित २० वर्षांनंतर हा व्हिडिओ चालवून पाहतील की मी बरोबर होतो की चूक. पण ज्या प्रकारे एआय प्रत्येक क्षेत्रात माणसांची जागा घेत आहे, त्यावर मस्क यांचा पूर्ण विश्वास आहे की आपण अशा जगाकडे वाटचाल करत आहोत जिथे मेहनत यंत्रांच्या वाट्याला येईल आणि माणसांच्या वाट्याला आराम येईल.
