Tata Trust Mehli Mistry: टाटा समूहात वाद सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. टाटा ट्रस्टने त्यांच्या तीन प्रमुख धर्मादाय संस्थांमध्ये मेहली मिस्त्री यांना विश्वस्त म्हणून पुन्हा नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसंच, त्यांना आजीवन विश्वस्त ठेवण्याचीही ऑफर देण्यात आली आहे. घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) ट्रस्टच्या इतर सदस्यांना या प्रस्तावाची माहिती दिली आहे आणि त्यांच्या संमतीने लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.
या प्रस्तावानुसार, मेहली मिस्त्री यांना सर रतन टाटा ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि बाई हीराबाई जमशेदजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनमध्ये पुन्हा नियुक्त केलं जाणार आहे. टाटा समूहाचे दिवंगत प्रमुख रतन टाटा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मिस्त्री यांची पहिल्यांदा २०२२ मध्ये टाटा ट्रस्टमध्ये नियुक्ती झाली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ २८ ऑक्टोबर रोजी संपत आहे. टाटा ट्रस्टने सध्या यावर कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिलाय.
ट्रस्टनं काय अट ठेवली?
टाटा ट्रस्टचा टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही १५६ वर्षे जुन्या टाटा समूहाच्या कंपन्यांची प्रवर्तक कंपनी आहे. सूत्रांनुसार, मिस्त्री आणि इतर तीन विश्वस्त प्रमित झवेरी, जहांगीर एचसी जहांगीर आणि डेरियस खम्बाटा यांनी वेणू श्रीनिवासन यांना विश्वस्त आणि उपाध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्तीला मंजुरी देताना ही अट ठेवली होती की, भविष्यात कोणत्याही विश्वस्ताची पुनर्नियुक्ती केवळ सर्वानुमतेच होईल, अन्यथा त्यांची मंजुरी रद्द केली जाऊ शकते.
मिस्त्रींच्या नावाला सहमती नाही
ट्रस्टनं जरी त्यांच्याकडून ऑफर दिली असली तरी, मिस्त्रींच्या आजीवन कार्यकाळाबद्दल ट्रस्टमध्ये मतभेद असल्याची माहिती आहे. एकीकडे एक गट विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा यांच्यासोबत असल्याचं मानलं जात आहे, तर दुसरा गट रतन टाटा यांच्या जुन्या समर्थकांशी संबंधित आहे. हे प्रकरण सरकारपर्यंतही पोहोचलं होतं, त्यानंतर नोएल टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती.
प्रस्तावामुळे काय बदल होईल
मागील काळात टाटा समूहाच्या वादाबद्दल सरकारनं दोन्ही पक्षांना सूचित केलं होतं की त्यांनी या समस्येचे निराकरण आपापसात सहमतीनं करावं आणि सार्वजनिक वादात रूपांतर करू नये, कारण भारतीय अर्थव्यवस्थेत टाटा समूहाचं विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे टाटा ट्रस्टनं मेहली यांच्याबाबत हा प्रस्ताव दिला आहे. जर मेहली यांना आजीवन विश्वस्त बनवण्याच्या प्रस्तावावर सहमती झाली, तर समूहातील सुरू असलेल्या वादांवरही विराम लागू शकतो.
