ATF Price Cut : नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात सर्वसामान्यांसाठी आणि उद्योग जगतासाठी संमिश्र बातम्या घेऊन आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात मोठी कपात केली असून, घरगुती पीएनजीच्या किमतीही कमी केल्या आहेत. मात्र, दुसरीकडे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या खिशाला कात्री लावत कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता विमान प्रवास स्वस्त होणार का? असा प्रश्न मध्यमवर्गींच्या मनात येत आहे.
विमान प्रवास स्वस्त होणार?
विमान कंपन्यांसाठी नवीन वर्षाची भेट म्हणून एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) दरात प्रति किलोलीटर ७,३५३.७५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत आता एटीएफचा दर ९२,३२३.०२ रुपये प्रति किलोलीटर झाला असून मुंबईत तो ८६,३५२.१९ रुपये इतका असेल. इंधन स्वस्त झाल्याने एअरलाईन्सचा परिचालन खर्च कमी होणार आहे. यामुळे तिकीट दर कमी होण्याची आशा असली, तरी विमान कंपन्या ही सवलत प्रवाशांना लगेच देतील का, याबाबत साशंकता आहे.
कमर्शियल सिलिंडर १११ रुपयांनी महागला; हॉटेलिंगवर परिणाम
हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यावसायिकांसाठी नवीन वर्ष महागडे ठरले आहे. १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत कमर्शियल सिलिंडर आता १,६९१.५० रुपयांना मिळेल, जो पूर्वी १,५८०.५० रुपयांना मिळत होता. मुंबईतही हा दर १,५३१ रुपयांवरून १,६४२.५० रुपयांवर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
वाचा - गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
पीएनजी ग्राहकांना नवीन वर्षाचे 'गिफ्ट'
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दिल्ली आणि एनसीआर परिसरातील घरगुती पीएनजीच्या (पाइप्ड नॅचरल गॅस) दरात कपात करून गृहिणींना दिलासा दिला आहे. दिल्लीत पीएनजीचा नवा दर ४७.८९ रुपये प्रति SCM झाला आहे. नोएडामध्ये हा दर ४७.७६ रुपये, तर गुरुग्राममध्ये ४६.७० रुपये प्रति SCM असेल.
