Richard Mille India price : भारतातील अब्जाधीश आणि सेलिब्रिटींच्या वर्तुळात सध्या एका खास घड्याळाची चर्चा रंगली आहे. हे घड्याळ म्हणजे केवळ वेळ दाखवणारे साधन नाही, तर ते 'अल्ट्रा-लक्झरी' लाइफस्टाइलचे प्रतीक बनले आहे. आपण बोलतोय 'रिचर्ड मिल' या ब्रँडबद्दल. अनंत अंबानी यांनी दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला चक्क ११ कोटी रुपयांचे रिचर्ड मिल घड्याळ भेट दिल्यानंतर या ब्रँडबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
या दिग्गज भारतीयांच्या मनगटावर 'रिचर्ड मिल'
भारतात रिचर्ड मिल घड्याळ असणे हे एका अत्यंत मर्यादित आणि खास क्लबचे सदस्य असण्यासारखे आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान 'RM 052' हे स्कल डिझाइन असलेले मॉडेल वापरताना दिसला आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याकडे या ब्रँडचे अनेक मॉडेल्स आहेत, ज्यांची किंमत ५ कोटी रुपयांच्या पुढे आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आणि अंबानी कुटुंबाकडे या ब्रँडचे 'ड्रॅगन थीम' असलेले खास एडिशन्स आहेत.
परंपरा नाही, तर 'रेसिंग कार'सारखे इंजिनीअरिंग!
रिचर्ड मिल या ब्रँडची सुरुवात केवळ २५ वर्षांपूर्वी झाली. याचे संस्थापक रिचर्ड मिल यांनी घड्याळ बनवताना पारंपरिक डिझाइनला छेद दिला. त्यांना घड्याळ हे एका 'रेसिंग कार' सारखे बनवायचे होते. जे वजनाला अत्यंत हलके पण वैशिष्ट्यपूर्ण असेल. २००१ मध्ये त्यांनी 'RM 001' हे पहिले मॉडेल लाँच केले, ज्याची किंमत तेव्हा १.३० लाख डॉलर्स होती आणि केवळ १७ घड्याळे बनवण्यात आली होती.
राफेल नदालची पसंती
या ब्रँडची खरी ताकद जाहिरातींपेक्षा मैदानात दिसते. टेनिस स्टार राफेल नदाल 'RM 027' हे घड्याळ घालून सामने खेळतो, ज्याचे वजन केवळ २० ग्रॅम आहे. धावपटू योहान ब्लेक आणि फॉर्म्युला-१ ड्रायव्हर्स रेस दरम्यान हे घड्याळ घालतात. वेगवान हालचाली आणि प्रचंड धक्क्यांमध्येही हे घड्याळ अचूक वेळ दाखवते, हीच याची खरी खासियत आहे.
स्पेसशिपमधील मटेरिअलचा वापर!
रिचर्ड मिल आपल्या घड्याळांमध्ये अशा मटेरिअलचा वापर करते, जे सहसा अंतराळयान आणि रेसिंग कारमध्ये वापरले जाते. यामध्ये टायटॅनियम, ग्रेफीन आणि कार्बन TPT चा वापर केला जातो. यामुळे घड्याळ खूप हलके होते आणि त्यामध्ये झटके सहण्याची विलक्षण क्षमता येते. घड्याळाचा बाहेरील भाग आधुनिक मशिनने बनवला जातो. मात्र, आतील अतिशय सूक्ष्म काम आजही तज्ज्ञ कारागिरांच्या हाताने केले जाते.
वाचा - म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
वर्षाला फक्त ६,००० घड्याळे, तरीही जगात 'सहावा' क्रमांक
मॉर्गन स्टेनलीच्या अहवालानुसार, रिचर्ड मिल वर्षाला केवळ ६,००० घड्याळे बनवते. मात्र, इतकी कमी उत्पादने असूनही, वार्षिक उलाढालीच्या बाबतीत हा ब्रँड जगातील सहावा सर्वात मोठा वॉच ब्रँड ठरला आहे. मर्यादित उत्पादन, जबरदस्त मार्केटिंग आणि अद्वितीय इंजिनीअरिंग यामुळे आज हे जगातील सर्वात महागड्या आणि दुर्मिळ ब्रँड्सपैकी एक बनले आहे.
