manmohan singh did not invest in stock market : सर्वाधिक परतावा देणारा गुंतवणूक पर्याय म्हणून शेअर मार्केट लोकप्रिय आहे. इथं जोखीम जास्त असली तर अभ्यासपूर्ण गुंतवणूक केली तर रात्रीत श्रीमंत झालेली अनेक उदाहरणे आहेत. जवळपास सर्वच श्रीमंत लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. यात राजकारणीही मागे नाहीत. मात्र, त्यातही काही लोक असे आहेत, ज्यांनी कधीही शेअर मार्केटची पायरी चढली नाही. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग त्यापैकीच एक नाव. डॉ. मनमोहन सिंग यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से आणि घटना आज प्रत्येक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. डॉ. सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. ते स्वतः अर्थतज्ञ होते. असे असूनही त्यांनी कधीच शेअर बाजारात पैसे गुंतवले नाही. याचं अनेकांना आश्चर्य वाटतं.
मनमोहन सिंग १९९१ मध्ये अर्थमंत्री झाले तेव्हा सेन्सेक्स ९९९ अंकांवर होता. त्यांच्या अर्थसंकल्पीय सुधारणांनंतर, वर्षाच्या अखेरीस सेन्सेक्स जवळजवळ दुप्पट झाला. पण वैयक्तिकरित्या त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली नाही. त्यांनी बँक एफडी आणि पोस्ट ऑफिस योजनांसारख्या पारंपारिक पद्धतींद्वारे गुंतवणुकीला प्राधान्य दिले.
एफडी आणि पोस्ट ऑफिस बचत योजना
२०१३ मध्ये ते पंतप्रधान असताना त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती ११ कोटी रुपये होती. डॉ सिंग आणि त्यांच्या पत्नीने आठ एफडीमध्ये गुंतवणूक केली होती, ज्याची रक्कम १ लाख ते ९५ लाख रुपयांपर्यंत होती. २०१३ मध्ये त्यांची एफडी आणि बँक बचत ४ कोटी रुपये होती, तर पोस्ट ऑफिस बचत ४ लाख रुपये होती. २०१९ मध्ये त्यांच्या दिल्ली आणि चंदीगडमधील घराची किंमत ७ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. २०१३ ते २०१९ दरम्यान मनमोहन सिंग यांच्या संपत्तीचे मूल्य ११ कोटी रुपयांवरून १५ कोटी रुपयांवर पोहोचले.
मुदत ठेव आणि राष्ट्रीय बचत योजनेत सर्वाधिक गुंतवणूक
२०१९ च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार, मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी गुरशरण कौर यांची संपत्ती १५ कोटी रुपयांची होती. त्याच्याकडे दिल्ली (वसंत कुंज) आणि चंदीगड (सेक्टर ११ बी) मध्ये २ मालमत्ता आहेत, ज्यांची किंमत ७ कोटी रुपये होती. गुरशरण कौर यांच्याकडे १५० ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत ३ लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडे बँक एफडी आणि बचत खात्यात ७ कोटींहून अधिक रक्कम होती. पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत योजनेत (NSS) १२ लाख रुपयांची गुंतवणूक होती. यामध्ये मुख्यतः त्यांच्या मुदत ठेवी आणि राष्ट्रीय बचत योजना (NSS) यांचा मोठा वाटा होता.
२ फेब्रुवारी २०१३ चे एक उदाहरण त्यांच्या आर्थिक नियोजन आणि शिस्तीबद्दल सांगते. त्या दिवशी त्यांनी ३ एफडीमध्ये २ कोटी रुपये गुंतवले, ज्यावर ३ वर्षात ६२ लाख रुपये उत्पन्न मिळाले. हिच गुंतवणूक पुढे चालू ठेवली. अशाप्रकारे त्यांनी ६ वर्षात शेअर बाजारापासून दूर राहून ४ कोटींची संपत्ती वाढवली. त्यांनी कधी शेअर बाजारात गुंतवणूक केल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
शेअर बाजारापासून दूर राहण्याचे कारण काय?
१९९२ मध्ये जेव्हा शेअर बाजारात प्रचंड खळबळ माजली होती. तेव्हा मनमोहन सिंग यांनी संसदेत विधान केले होते की, “शेअर मार्केटमुळे माझी झोप उडणार नाही.” त्यावेळी ते अर्थमंत्री होते. हे विधान केवळ त्यांचा गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच दर्शवत नाही तर भारतातील या महान आर्थिक सुधारकाने आपली संपत्ती वाढवण्यासाठी पारंपारिक पद्धतींवर (एफडी आणि पोस्ट ऑफिस योजना) विश्वास ठेवल्याचेही स्पष्ट होते.