Home Loan : स्वतःचे घर खरेदी करणे हे प्रत्येक मध्यमवर्गीयाचे स्वप्न असते. वर्षानुवर्षांची बचत हाताशी असूनही, घराच्या वाढत्या किमतींमुळे आपल्याला 'होम लोन'चा आधार घ्यावाच लागतो. मात्र, गृहकर्जासाठी अर्ज करताना बँक घराच्या किमतीच्या १००% कर्ज कधीच मंजूर करत नाही. यामागे बँकांचे नेमके धोरण काय आणि तुम्हाला किती कर्ज मिळू शकते, याचे सविस्तर विश्लेषण.
बँका १००% कर्ज का नाकारतात?
बँका मालमत्तेच्या मूल्याच्या १००% कर्ज न देण्यामागे 'सुरक्षा' हे मुख्य कारण आहे. भविष्यात जर मालमत्तेच्या किमती कमी झाल्या आणि कर्जदाराने हप्ते भरण्यास कसूर केली, तर बँक मालमत्ता विकून आपले पैसे वसूल करते. अशा वेळी जर कर्ज १००% असेल आणि घराची किंमत घसरली असेल, तर बँकेचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच बँका स्वतःची जोखीम कमी करण्यासाठी 'मार्जिन मनी' किंवा 'डाउन पेमेंट'ची अट घालतात.
तुम्हाला किती कर्ज मिळू शकते? (LTV रेश्यो)
आरबीआयच्या नियमांनुसार, मालमत्तेच्या एकूण किमतीच्या सुमारे ७०% ते ९०% पर्यंत कर्ज मिळू शकते. यालाच 'लोन टू व्हॅल्यू' रेश्यो म्हणतात.
- ३० लाखांपर्यंतचे कर्ज : घराच्या किमतीच्या ९०% पर्यंत कर्ज मिळू शकते.
- ३० लाख ते ७५ लाख : साधारणपणे ८०% पर्यंत कर्ज मिळते.
- ७५ लाखांहून अधिक : घराच्या किमतीच्या ७५% पर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते.
गृहकर्जाची रक्कम ठरवणारे ५ महत्त्वाचे घटक
१. क्रेडिट स्कोअर
तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० पेक्षा जास्त असेल, तर बँका तुम्हाला स्वस्त दरात आणि सहज कर्ज देतात. स्कोअर खराब असल्यास कर्ज नाकारले जाऊ शकते किंवा व्याजाचा दर जास्त लावला जातो.
उत्पन्न आणि विद्यमान कर्ज
साधारणपणे, बँक तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ६० पट पर्यंत कर्ज देण्यास तयार असते. मात्र, तुमच्यावर आधीच इतर कर्जांचे हप्ते असतील, तर तुमची गृहकर्ज पात्रता कमी होते.
वय
कमी वयात कर्ज घेतल्यास परतफेडीसाठी जास्त कालावधी मिळतो. ज्यांचे वय जास्त आहे, त्यांना बँक 'रिस्की' ग्राहक मानते, कारण त्यांच्या निवृत्तीचा काळ जवळ असतो. अशा वेळी कर्जाचा कालावधी कमी केला जातो.
मालमत्तेचे मूल्यांकन
बँकेचे तांत्रिक तज्ज्ञ घराची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे मूल्य ठरवतात. तुम्ही घर कितीला विकत घेतले यापेक्षा बँकेने ठरवलेले मूल्य कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाचे असते.
वाचा - एफआयआयचा 'एक्झिट' मोड सुरूच! १५ दिवसांत २२,५३० कोटींचा काढला पाय; बाजारात भितीचे वातावरण
डाउन पेमेंटची क्षमता
तुमच्याकडे जेवढी जास्त बचत असेल आणि तुम्ही जेवढे जास्त डाउन पेमेंट कराल, तेवढा कर्जाचा बोजा कमी राहील आणि बँकही अधिक विश्वासाने कर्ज मंजूर करेल.
