Priya Sachdeva : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा पूर्वाश्रमीचा पती आणि सोना कॉमस्टार कंपनीचे अध्यक्ष संजय कपूर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आपल्या पश्चात त्यांनी तब्बल ३० हजार कोटींची संपत्ती मागे सोडली आहे. संजय कपूर यांच्या निधनानंतर, २३ जून २०२५ रोजी जेफ्री मार्क ओव्हरली यांची कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, आता या प्रचंड संपत्तीवरून कौटुंबिक कलह होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नीला बोर्डात स्थान
संजय कपूर यांच्या निधनानंतर, कंपनीच्या भागधारकांनी आवश्यक बहुमताने त्यांच्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांना कंपनीच्या गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यास मान्यता दिली. त्यांना बोर्डावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संजय कपूर आणि प्रिया सचदेव यांनी आठ वर्षांपूर्वी, म्हणजेच २०१७ मध्ये लग्न केले होते. प्रिया सचदेव या संजय कपूर यांची तिसरी पत्नी आहेत.
प्रिया सचदेव कोण आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची पार्श्वभूमी काय?
प्रिया सचदेव यांचा वैयक्तिक जीवनपटही चर्चेत राहिला आहे. संजय कपूर यांचे पहिले लग्न १९९६ मध्ये नंदिता महतानीशी झाले होते, परंतु २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर संजय कपूर यांनी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न केले, पण हे लग्नही २००३ मध्ये झाले आणि २०१६ मध्ये १३ वर्षांनी ते संपुष्टात आले. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी प्रिया सचदेवशी तिसरे लग्न केले. प्रिया सचदेव यांचेही हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न अमेरिकन हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवालशी झाले होते, परंतु ते लग्न फार काळ टिकले नाही आणि २०११ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
बोर्डात प्रिया सचदेव यांची नियुक्ती कशी झाली?
कंपनीच्या कॉर्पोरेट प्रमोटर ऑरियस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नामांकनानंतर सोना कॉमस्टारमध्ये प्रिया सचदेव यांची नियुक्ती शक्य झाली आहे. ऑरियस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडकडे सोना कॉमस्टारमध्ये २८.०२ टक्के हिस्सा आहे, तर ७१.९८ टक्के हिस्सा भागधारकांकडे आहे.
कौटुंबिक वाद आणि आरोप-प्रत्यारोप
खरं तर, प्रिया सचदेव कपूर या एक गुंतवणूक व्यावसायिकसोबतच एक व्यावसायिक महिला देखील आहेत. त्या ऑरियस इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या संचालक देखील आहेत. संजय कपूरने सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे साम्राज्य मागे सोडले तेव्हा त्या चर्चेत आल्या. या प्रचंड संपत्तीवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी, त्यांची आई आणि सोना ग्रुपच्या माजी अध्यक्षा राणी कपूर यांनी कंपनीच्या बोर्डाला पत्र लिहून वार्षिक सर्वसाधारण सभा दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
वाचा - पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
मात्र, कंपनीच्या बोर्डाने त्यांच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. संजय कपूर यांच्या आईने आरोप केला होता की, "संपूर्ण कुटुंब दुःखात असताना, काही लोक कुटुंबाचा वारसा हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत." यावरून कपूर कुटुंबात संपत्तीवरून गृहकलह सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.